पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, पॅकेज घोषित करणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पीडितांशी संवाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 11:50 AM2021-08-02T11:50:58+5:302021-08-02T13:08:28+5:30
किती नुकसान झाले आहे त्याची सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरेदारे एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरू आहे
सांगली - पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांची काळजी घेणार. पॅकेज घोषित करणार नाही. नुकसानीचा संपूर्ण आढावा घेऊ असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील दौऱ्यावेळी केलं आहे. सांगलीतील पलूस येथील भिलवडी येथे मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, पुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अतिवृष्टीचा अंदाज आला त्याच क्षणापासून प्रशासनाने काम सुरू केले. सांगलीच्या या भागात ४ लाख लोकांचे स्थलांतर केले. कुठलीही जीवितहानी होणार नाही याकडे प्राधान्य दिलं. विश्वजित कदम यांच्याकडून माहिती घेतली आहे. लोकांचे आर्थिक आणि शेतीचे नुकसान झाले आहे. मी तळिये, चिपळूण, कोल्हापूर याठिकाणी पूरग्रस्त भागाचा दौरा केला आहे, नुकसान पाहिले आहे. तुमच्या सर्वांच्या साथीने मी मार्ग काढणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच किती नुकसान झाले आहे त्याची सगळी आकडेवारी मिळते आहे. शेती, घरेदारे एकूणच किती नुकसान झाले याचा अंदाज घेणे सुरू आहे. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढावा लागेल. कटू निर्णय घ्यावे लागतील , आपली त्याला तयारी हवी. कारण दरवर्षी हे पुराचे संकट येणार आणि आपण त्यातून उभे राहणार की परत दुसऱ्या वर्षी तेच होणार. दरवर्षी पाण्याच्या पातळ्या मोजण्यात आयुष्य घालवायचे नाही. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार म्हणून जे आपल्या हिताचे आहे, ते करणार असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
असं काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2021
दरम्यान, अशी काही आपत्ती आल्यास, काही झाले की लगेच पॅकेज जाहीर केले जाते. मग त्यातला पैसा कुठे जातो ते कळत नाही. मला प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करायचे आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या सूचनांचा नक्की विचार करू. पॅकेज जाहीर करून तत्पूर्ती मलमपट्टी करण्याने कोणतीही नैसर्गिक आपत्ती टळू शकत नाही. अनुदान देऊन जर दरवर्षी घरेदारे,संसार महापुराने उध्दवस्त होत असतील, नागरिकांना वारंवार त्याच त्याच समस्येला सामोरे जावे लागत असेल तर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा लागेल. शासकीय अधिकाऱ्यांकडून पुराच्या दहकतेची ,नुकसानीची माहिती प्राप्त झाली आहे.दरवर्षी केवळ पाण्याची पातळी मोजत बसण्यापेक्षा कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन कटिबध्द आहे.सरपंच मंडळी कडून निवेदन ही स्वीकारली आहेत. या सगळ्यांचा पूर्ण आढावा घेवून कायमस्वरूपी कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासन धोरणात्मक निर्णय घेईल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.
कृष्णाकाठच्या पूरग्रस्तांच्या वतीने भिलवडी सह परिसरातील सर्व गावच्या सरपंचांच्या हस्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले. भिलवडी सह परिसरातील कृष्णाकाठची गावे शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करून सरसकट सानुग्रह अनुदान द्यावे,शेतीला भरीव निधी द्या, कोरोना व महपुराने बाधित व्यापाऱ्यांना मदत करा,वसंतदादानगर, मौलानानगर,आण्णाभाऊ साठेनगर, साखरवाडी या भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करावे,कृष्णा नदीवर असणाऱ्या पूलाला समांतर पूल तयार करावा आदी माग न्यांचा यामध्ये समावेश आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे,यावेळी खासदार धैर्यशील माने,शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर,नितीन बानुगडे- पाटीलआमदार मोहनराव कदम,अनिल बाबर, सुमनताई पाटील, अरुण आण्णा लाड,महेंद्र लाड,गिरीश चितळे, संग्राम पाटील,सुरेंद्र वाळवेकर,भिलवडी च्या सरपंच सौ.सविता महिंद, पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.प्रास्ताविक आर.डी.पाटील यांनी तर आभार दिपक पाटील यांनी केले.
मुख्यमंत्र्यांचा सूचक नमस्कार
भिलवडी गावच्या बाजार मैदानात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ठीक ११:११ वा.आगमन झाले.मुख्यमंत्री व्यासपीठावर चढले त्यांनी सर्वांना हात जोडून नमस्कार केला.तोंडावर मास्क लावण्याचे खुणावले.महापूर आणि कोरोनचा आपणास एकत्रित सामना करावयाचा असल्याचे ही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.