Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2021 02:41 PM2021-07-22T14:41:59+5:302021-07-22T14:42:55+5:30

Ratnagiri, Raigad Flood Updates: त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.

Maharashtra Flood: Urgent meeting of CM Uddhav Thackeray to review situation in Ratnagiri, Raigad | Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

Maharashtra Flood: रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक

googlenewsNext

मुंबई - गेल्या २४ तासांत अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका तातडीच्या बैठकीत आढावा घेतला. हवामान विभागाने पुढील तीन दिवस कोकण किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा इशारा सांगितला आहे. राज्यात रेड, ऑरेंज अलर्ट दिला असून मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच इतर संबंधित विभागांना सतर्क राहून बचाव कार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्याचप्रमाणे नद्यांच्या पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी बाळगावी तसेच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार आदींची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड  रुग्ण असतील त्याठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या.यावेळी मुख्य सचिवांनी एनडीआरएफच्या तुकड्या , स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक दलाचे जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत  माहिती देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीची धोका पातळी ७ मीटर असून सध्या ती ९ मीटर वरून वाहते आहे. वशिष्टी नदीची धोका पातळी ७ मीटर असून ती ७.८ मीटर वरून वाहते आहे. काजळी नदी धोका पातळीच्या १.७४ मीटर वरून वाहत असून कोदवली, शास्त्री, बावनदी या नद्या धोका पातळीवरून वाहत आहेत. यामुळे खेड, चिपळूण, लांजा,राजापूर, संगमेश्वर या शहरे व परिसरातील गावांमध्ये शासकीय यंत्रणांनी नागरिकांना हलविणे, स्थलांतर करणे व इतर मदत कार्य जोरात सुरु केले आहे.

रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदी  धोका पातळी वरून वाहत असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, गाढी , उल्हास या नद्या देखील इशारा पातळीवर वाहायला सुरुवात झाली आहे. महाबळेश्वर परिसरात गेल्या २४ तासांत ४८० मिमी पाऊस झाल्याने सावित्री व इतर नद्यांची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे अशी माहिती बैठकीत देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी प्रकल्पात देखील जोरदार पाऊस झाल्याने सांडव्यावरून पाणी वाहत आहे

धरण परिसरात देखील जोरदार पाऊस

भातसा धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३३६ मिमी पाऊस झाला असून धरण ६३ टक्के तर सूर्या धरण परिसरात १५६ मिमी पाऊस झाला असून ते देखील ६३ टक्के भरले आहे. बारावी परिसरात देखील २५६ मिमी पाऊस झाला त्यामुळे धरण ६२ टक्के तर मोरबे धरणही २६० मिमी पाऊस झाल्याने ७१ टक्के भरले आहे. या धरणांचे दरवाजे कधीही उघडण्याची शक्यता असल्याने या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना देण्यात आल्या असून प्रशासकीय यंत्रणांना देखील तसे सांगण्यात आले आहे

Read in English

Web Title: Maharashtra Flood: Urgent meeting of CM Uddhav Thackeray to review situation in Ratnagiri, Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.