Maharashtra Floods : क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे काय रे भाऊ?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 12:13 PM2019-08-12T12:13:02+5:302019-08-12T12:18:50+5:30
धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.
मुंबई - महापूर, तसेच अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रात 40 जणांचा मृत्यू झाला असून, त्यापैकी 19 जण सांगली जिल्ह्यातील आहेत. सांगली, कोल्हापूर भागातील तब्बल 200 रस्ते आणि पूल बंद असल्याने मदत पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील पूरस्थितीची हवाई पाहाणी केली. पुरामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला रशिया दौरा रद्द केला आहे.
राज्यातील दहा जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून, 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफच्या 32, एसडीआरफच्या 3, लष्कराच्या 21, नौदलाच्या 41, तटरक्षक दलाची 16 पथके कार्यरत आहेत. 226 बोटींद्वारे बचावकार्य सुरू आहे. पुरामुळे 40 व्यक्तींचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाले आहेत, तर 48 जनावरे मृत्युमुखी पडल्याची माहिती माहिती राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातून देण्यात आली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यास पुराचा धोका संभवतो. एक टीएमसी, क्युसेक, क्युमेक, निळी रेषा, लाल रेषा म्हणजे नेमकं काय हे जाणून घेऊया.
टीएमसी (TMC)
एक टीएमसी म्हणजे One Thousand Millions Cubic Feet आहे. म्हणजेच01 अब्ज इतके घन फूट असतं.
01 TMC = 28,316,846,592 ltrs.
क्युमेक (Cumec)
एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक आहे. या प्रमाणात एक सेकंदात 1000 लिटर पाणी बाहेर पडते.
01 CUMEC = 1000 Litres/Second
क्युसेक (Cusec)
एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते.
01 CUSEC = 28.317 Litres/Second
महाराष्ट्रातील मोठी धरणे
उजनी - 117.27 TMC
कोयना - 105.27 TMC
जायकवाडी - 76.65 TMC
पेंच तोतलाडोह - 35.90 TMC
पूर्णा येलदरी - 28.56 TMc
पूर रेषा कशा आखतात?
पांढरी रेषा
धरणातून 30,000 क्युसेक पाणी सोडले तर त्या नदीपात्राची पाणीपातळी वाढते. पाणी पातळी जेथे पोहचते ती रेषा 'व्हाईट लाईन' अथवा 'पांढरी रेषा' म्हणून ओळखली जाते.
निळी रेषा
धरणातून 60,000 क्युसेक वेगाने पाणी सोडल्यानंतर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा 'ब्लू लाईन' अथवा 'निळी रेषा' म्हणून ओळखली जाते.
लाल रेषा
धरणातून 1,00,000 क्युसेक वेगाने पाणी सोडले गेल्यावर नदीपात्रातील पाणी पातळी जेथे पोहचेल ती रेषा 'रेड लाईन' अथवा 'लाल रेषा' म्हणून ओळखली जाते.