‘लोकमत’च्या सुरेश द्वादशीवार यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार
By admin | Published: December 16, 2015 01:51 AM2015-12-16T01:51:08+5:302015-12-16T01:51:08+5:30
महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या साहित्य व समाजकार्य (२०१५) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, वैचारिक व ललित साहित्यातील
नागपूर : महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या साहित्य व समाजकार्य (२०१५) पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, वैचारिक व ललित साहित्यातील उल्लेखनीय योगदानासाठी देण्यात येणारा साहित्य जीवनगौरव पुरस्कार ‘लोकमत’च्या नागपूर आवृत्तीचे संपादक सुरेश द्वादशीवार यांना देण्यात येणार आहे. दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
साहित्य व समाजकार्य या दोन्ही क्षेत्रातील प्रत्येकी पाच म्हणजे एकूण दहा पुरस्कार दिले जाणार असून, समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार विद्या बाळ, पुणे (दोन लाख रुपये व स्मृतिचिन्ह), उत्तम कांबळे, नाशिक, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार (एक लाख रुपये व स्मृतिचिन्ह), भीम रासकर, पुणे, महिला राजसत्ता आंदोलनातील कार्याबद्दल प्रबोधन विभागातील कार्यकर्ता पुरस्कार, कृष्णा चांदगुडे, नाशिक, जातपंचायतीच्या विसर्जनासाठीचे कार्य केल्याबद्दल, सामाजिक प्रश्न विभागातील कार्यकर्ता पुरस्कार, पल्लवी रेणके (मुंबई) यांना भटक्या-विमुक्तांसाठी असंघटित कष्टकरी विभागात कार्य केल्याबद्दल अनिता दातार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थचा (प्रत्येकी ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह) पुरस्कार देण्यात येणार आहे, तर साहित्य पुरस्कार विजेत्यांत शरद बेडेकर, मुंबई यांच्या ‘समग्र निरिश्वरवाद’ या पुस्तकाला वैचारिक ग्रंथ पुरस्कार, नितीन दादरावाला, ‘प्रतिमा आणि प्रचिती’ या पुस्तकाला अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, नागपूर यांच्या ‘खेळकर’ या कादंबरीला ललित ग्रंथ पुरस्कार, तर अजित देशमुख, मुंबई यांच्या ‘सुस्साट’ या नाटकासाठी रा. शं. दातार नाट्य पुरस्कार (प्रत्येकी २५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह) दिला जाणार आहे. या पुरस्कारांचे वितरण पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या समारंभात केले जाणार आहे. या पुरस्कारांची निवडप्रक्रिया साधना ट्रस्ट (पुणे) यांच्या वतीने केली जाते.