महाराष्ट्राला मिळणार 'शर्ट इन' करणारे मुख्यमंत्री !
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 06:02 PM2019-11-27T18:02:00+5:302019-11-27T18:02:51+5:30
उद्धव ठाकरे कॉर्पोरेटप्रमाणे शर्ट इन करून सभागृहाचे कामकाज करणार असंच दिसत आहे. त्यामुळे सभागृहाला कॉर्पोरेट टच मिळणार हे नक्की.
मुंबई - नोकरीसाठी इंटरव्ह्युवला जाताना टाप-टिप कपड्यांसह शर्ट इन करून जावे असा एक नियमच आहे. नोकरी असो वा कॉर्पोरेट क्षेत्र कपडे चकाचक आणि शर्ट इन आलेच. मात्र राजकारणात असा काही नियम नाही. किंबहुना शर्ट इन करणारे नेते फारसे दिसत नाहीत. मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याला अपवाद आहेत. त्यांची कपडे परिधान करण्याची शैली पाहता, महाराष्ट्राला आता शर्ट इन करणार मुख्यमंत्री मिळणार आहे.
देशाच्या राजकारणात फारच निवडक नेते शर्ट इन करून सभागृहात जातात. राज्य पातळीवर पाहिल्यास, आधीच्या भाजप सरकारमधील मंत्री गिरीश महाजन हे शर्ट इन करून असायचे. त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही नेता शर्ट करून सभागृहात गेलेला कधी दिसला नाही. तर देवेंद्र फडणवीस, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, विलासराव देशमुख हे नेते जॅकेट परिधान करूनच सभागृहात दिसले आहेत.
महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत विधानसभा किंवा विधान परिषद सभागृहात शर्ट इन करून हजेरी लावणारा मुख्यमंत्री जनतेने फारसे पाहिले नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्या रुपाने तेही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे अनेकदा महत्त्वाच्या बैठकीच्या वेळी शर्ट इन करून उपस्थित राहिलेले आपण पाहिले आहेत.
याआधीच्या मुख्यमंत्र्यांनी प्रामुख्याने जॅकेट आणि कुर्ता पायजामा घालून सभागृहाचे कामकाज केलेले आहे. तर अनेक नेते कोट घालून कामकाज करतात. मात्र उद्धव ठाकरे कॉर्पोरेटप्रमाणे शर्ट इन करून सभागृहाचे कामकाज करणार असंच दिसत आहे. त्यामुळे सभागृहाला कॉर्पोरेट टच मिळणार हे नक्की.