Maharashtra Government: शिवसेना आमदारांची शुक्रवारी मुंबईत बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 03:29 AM2019-11-20T03:29:52+5:302019-11-20T06:16:06+5:30
मुक्कामासाठी येण्याच्या दिल्या सूचना
मुंबई : शिवसेनेच्या विधानसभेवर निवडून आलेल्या, तसेच विधानक परिषद सदस्यांची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी आपल्या निवासस्थानी बोलाविली आहे. सत्तास्थापनेबाबत गेले काही दिवस सुरू असलेल्या हालचालींबाबत आमदारांना यावेळी उद्धव ठाकरे सविस्तर माहिती देतील, असे सांगण्यात आले.
पाच दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीने या, असे निरोप आमदारांना देण्यात आले आहेत. सोबत ओळखपत्र, पॅनकार्ड आणण्यासही सांगितले आहे. त्यामुळे आमदारांना पुन्हा एखाद्या हॉटेलवर मुक्कामासाठी पाठविले जाईल, असे कळते. राज्यपालांनी गेल्या आठवड्यात शिवसेनेला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले, पण शिवसेनेच्या नेत्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पाठिंब्याचे पत्र सादर करता आले नव्हते.
चिंता करू नका, सरकार आपलेच, मुख्यमंत्रीही आपलाच असणार, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना दिलेला आहे. मात्र, कालच्या दिल्लीतील घटनांनंतर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार येणार की नाही, याबाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे आमदारांच्या उद्धव बैठकीत ठाकरे काय बोलतात, याबाबत उत्सुकता आहे.