Maharashtra Government: स्थानिकांची नवी व्याख्या कोणती?; नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 12:23 PM2019-11-29T12:23:51+5:302019-11-29T12:25:37+5:30
भाजपाचे नेते नितेश राणेंनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
मुंबईः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. ज्या शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या नेत्यांना पोटशूळ उठला असून, ते शिवसेनेवर वारंवार टीका करत आहेत. भाजपाचे नेते नितेश राणेंनीही ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्र विकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या देण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या मते, स्थानिक म्हणजे मराठी माणूस (भूमिपुत्र) असा होता. परंतु उद्धव ठाकरेंनी स्थानिकांची नवी व्याख्या शोधून काढली आहे?, असं म्हणत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
तर दोन दिवसांपूर्वीच त्यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारवर टीका केली होती. भाजपाचे आमदार नितेश राणेंनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं होतं. मला अभिमान आहे की ज्या पक्षाकडून मी आमदारकीची शपथ घेतलेली आहे, त्या पक्षानं सत्तेसाठी लाचारी केली नाही. जेव्हा आमच्याकडे समर्थन नव्हतं, तेव्हा आमचे नेते फडणवीसांनी सांगितलं की, सत्ता स्थापन करू शकत नाही. त्याच्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये मीटिंग घेतली नाही. लोकांचे तळवे चाटले नाहीत म्हणून मला अभिमान आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार आहे, असं म्हणत त्यांनी नाव न घेता शिवसेनेवर हल्लाबोल केला होता.Maha agadhi CMP says 80% jobs for locals..
— nitesh rane (@NiteshNRane) November 29, 2019
So LOCALS here mean Balasaheb Thackerays definition of Locals which mean “Marathi Manus only” or Uddhav Thackerays NEW definition of locals ??
विधिमंडळ आणि मुख्यमंत्रीची खुर्ची थोडी वेगळी आहे. बंगल्यात बसून आदेश देणं सोपं असतं. विधिमंडळात प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि ती अधिकृत द्यावी लागतात. सभागृहात काय होणार आहे लवकरच कळेल. पहिल्या दिवसापासूनच आमचा गोळा बारूद तयार आहे. आता फक्त मैदानात या, असं आव्हानच त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.