Maharashtra Government: 'अब की बार, देवेंद्र फडणवीस पर वार'; सरकार पडताच खडसेंनी सोडला पहिला 'बाण'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:05 PM2019-11-27T12:05:15+5:302019-11-27T12:10:01+5:30
देवेंद्र सरकार पडताच खडसेंचा 'राग'; भाजपाला घरचा आहेर
मुंबई: देवेंद्र सरकार-२ कोसळताच भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सर्वांना सोबत घेऊन निवडणूक लढवली असती तर २५ जागा वाढल्या असत्या, असं म्हणत खडसेंनी आपली नाराजी व्यक्त केली. पक्षातील वरिष्ठ नेत्यांची तिकीट कापल्यानं, त्यांना विश्वासात न घेतल्यानंच भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचं खडसे अप्रत्यक्षपणे म्हणाले. नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. माझ्यासह विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळेंना तिकीट देण्यात आलं नाही. मात्र किमान आम्हाला सक्रीय केलं असतं, तरी पक्षाच्या २५ जागा वाढल्या असत्या, असं खडसे म्हणाले. पक्ष चुकत नसतो. ज्यांच्याकडे धुरा दिली जाते, त्यांचे निर्णय चुकत असतात, असं म्हणत खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. फडणवीस यांनी कालच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. बहुमताची जुळवाजुळव करण्यात अपयश आल्यानं भाजपा सरकार कोसळलं.
मला जाणीवपूर्वक बाजूला सारण्याचं कारण काय, हे अद्याप समजू शकलेलं नाही. मी पक्षासाठी ४२ वर्षे तपश्चर्या केली. पक्ष वाढावा यासाठी मेहनत घेतली. पण पक्षाच्या विस्तारासाठी खस्ता खाणाऱ्या नेत्यांनाच बाजूला करण्यात आलं, अशा शब्दांत खडसेंनी त्यांची नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी सिंचन घोटाळ्यावर भाष्य केलं. सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे आम्ही त्याचवेळी रद्दीत विकले. कारण त्यावेळी रद्दीला चांगला भाव होता, असं म्हणत खडसेंनी अजित पवारांना सोबत घेणाऱ्या भाजपाच्या भूमिकेवर सूचक प्रतिक्रिया दिली.