Maharashtra Government: फिर एक बार भाजपा सरकार?; सत्ता स्थापनेसाठी दोन स्पेशल प्लान तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 06:59 AM2019-11-20T06:59:45+5:302019-11-20T07:03:20+5:30
सत्ता स्थापनेसाठी भाजपाच्या जोरदार हालचाली
मुंबई: शिवसेनेकडून दररोज होणारी टीका बाजूला ठेवून जुन्या मित्रपक्षाला पुन्हा जवळ आणण्यासाठी भाजपाचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम असलेल्या आणि त्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या संपर्कात असलेल्या शिवसेनेला सोबत घेण्यासाठी भाजपानं हालचाली सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे याचवेळी भाजपानं प्लान बीदेखील तयार ठेवला आहे.
शिवसेनेला सोबत घेण्याची तयारी भाजपानं सुरू केली असली तरी मुख्यमंत्रिपदाबद्दल तडजोड केली जाणार नाही, या भूमिकेवर भाजपा अद्यापही ठाम आहे. भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्यानं याबद्दलची माहिती दिली. उद्या युतीचं सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा झाली तरी मुख्यमंत्रिपद सोडायचं नाही, असं भाजपानं ठरवलं आहे. हा मुद्दा केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही. आज शिवसेनेसमोर भाजप झुकला तर एनडीएतील इतर घटकपक्ष त्या-त्या राज्यांमध्ये भाजपाला अशाच पद्धतीनं सत्तेत वाटा मागतील. भाजपला ते परवडणारं नाही. मित्रपक्षांच्या प्रत्येक मागणीसमोर भाजप झुकणार नाही, असा संदेश महाराष्ट्राच्या निमित्तानं भाजपा एनडीएतील मित्रपक्षांना देऊ इच्छितो, असं या नेत्यानं सांगितलं.
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचं सरकार स्थापन होणार नसेल आणि शिवसेना भाजपासोबत येण्यास तयार असेल तर शिवसेनेला सन्मानानं सोबत घेण्याची आमची तयारी असेल. महाशिवआघाडीबाबत बरेच पुढे निघून गेल्यानंतर यू टर्न घेत भाजपाबरोबर जायचं असेल तर त्यासाठी काही कारणं शिवसेनेला द्यावी लागतील. अशावेळी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेच्या बचावासाठी समोर केला जाईल. याशिवाय बचावाचे काही मुद्दे आम्हीदेखील सुचवू, अशी माहिती या नेत्यानं दिली.
भाजपानं सत्ता स्थापनेसाठी प्लान बीदेखील तयार ठेवला आहे. यामध्ये राष्ट्रवादीची महत्त्वाची भूमिका असेल. भाजपाचे 105 तर राष्ट्रवादीचे 54 आमदार आहेत. त्यांचं संख्याबळ 159 होतं. याशिवाय भाजपाला लहान पक्ष व अपक्ष अशा 14 आमदारांचा पाठिंबा पाहता, संख्याबळ 173 होतं. राष्ट्रवादी सरकारमध्ये सहभागी झाली नाही, तरी भाजपला विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अनुपस्थित राहून मदत करू शकते. राष्ट्रवादीचे 54 सदस्य अनुपस्थित राहिल्यास सभागृहात 234 सदस्य उरतात. अशा वेळी बहुमतासाठी भाजपला 117 आमदारांची गरज असेल आणि भाजपकडे 119 आमदार आहेत. त्यामुळे सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकू शकेल. याच पद्धतीनं राष्ट्रवादीनं 2014 मध्ये भाजपाला मदत दिली होती. त्यामुळे शिवसेनेची मोठी कोंडी झाली होती. आताही त्याचीच पुनरावृत्ती होऊ शकते.