Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 02:32 AM2019-11-20T02:32:15+5:302019-11-20T06:20:26+5:30

पाच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर भाजप ठाम; संजय राऊतांनीही आठवलेंना सुनावले

Maharashtra Government: BJP-Shiv Sena opposition to Eighth proposal | Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध

Maharashtra Government : आठवलेंच्या प्रस्तावाला भाजप-शिवसेनेचा विरोध

Next

मुंबई : भाजप-शिवसेनेचेच सरकार राज्यात व्हावे आणि भाजपने तीन वर्षांसाठी व शिवसेनेने दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे अशी सूचना केंद्रीय राज्यमंत्री व रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली खरी पण शिवसेनेचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, आता राज्यमंत्री आहात, कॅबिनेट मंत्री कसे व्हाल यासाठी प्रयत्न करा, असा टोला शिवसनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आठवले यांना हाणला. दुसरीकडे अशा कोणत्याही फॉर्म्युल्यावर चर्चेचा प्रश्नच नाही, असे भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने लोकमतला सांगितले.

आठवले यांनी काल दिल्लीत बोलताना तीन-दोन वर्षांच्या फॉर्म्युल्याबाबत आपले संजय राऊत यांच्याशी बोलणे झाले असून यावर भाजपशी चर्चेची तयारी त्यांनी दर्शविली असल्याचा दावा केला होता. राऊत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्या बाबत इन्कार केला. ते म्हणाले की, शिवसेनेच्याच नेतृत्वातील सरकार येईल व पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल.

भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शिवसेनेला दोन वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचा प्रश्नच नाही. आम्ही त्या बाबतची भूमिका आधीही स्पष्ट केलेली आहे. उद्या युतीचे सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा झाली तरी मुख्यमंत्रिपदावर तडजोड स्वीकारायची नाही, असे भाजपने ठरविले आहे. हा मुद्दा केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही. आज शिवसेनेसमोर भाजप झुकला तर एनडीएतील इतर घटकपक्ष त्या-त्या राज्यांमध्ये भाजपला अशाच पद्धतीने सत्तेत वाटा मागतील. भाजपला ते परवडणारे नाही. मित्रपक्षांच्या प्रत्येक मागणीसमोर भाजप झुकणार नाही, असा संदेश या महाराष्ट्राच्या निमित्ताने भाजप एनडीएतील मित्रपक्षांना देऊ इच्छितो.

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे सरकार होणार नसेल आणि शिवसेना भाजपसोबत येण्यास तयार असेल तर शिवसेनेला सन्मानाने सोबत घेण्याची आमची तयारी असेल. महाशिवआघाडीबाबत बरेच पुढे निघून गेल्यानंतर यू टर्न घेत भाजपबरोबर जायचे असेल तर त्यासाठी काही कारणे शिवसेनेला द्यावी लागतील. अशावेळी हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेच्या बचावासाठी समोर केला जाईल याशिवाय बचावाचे काही मुद्दे आम्हीही सुचवू, असे हा नेता म्हणाला.

...तर झाले गेले ते विसरून जाण्याची भूमिका?
शिवसेनेने इतकी कडवट टीका केल्यानंतरही त्यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याची भाजपची भूमिका दिसते. राज्याला स्थिर सरकार युतीच देऊ शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी झाले गेले ते विसरून जाण्याची भूमिका घेतली जाऊ शकते, असे मत भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केले.

Web Title: Maharashtra Government: BJP-Shiv Sena opposition to Eighth proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.