उधळपट्टी! डोक्यावर 4.6 लाख कोटींचे कर्ज तरीही महाराष्ट्र सरकार खरेदी करणार 6 कोटींच्या 30 व्हीआयपी कार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2018 05:52 PM2018-03-16T17:52:51+5:302018-03-16T17:52:51+5:30
सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर सुमारे 4.6 कोटींचे कर्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने व्हीआयपी मंडळींच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये वापरण्यासाठी सुमारे 5.8 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 30 व्हीआयपी कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे.
मुंबई - महाराष्ट्र सरकाराच्या डोक्यावर असलेला कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्र सरकारच्या डोक्यावर सुमारे 4.6 कोटींचे कर्ज आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने व्हीआयपी मंडळींच्या जिल्हा दौऱ्यांमध्ये वापरण्यासाठी सुमारे 5.8 कोटींहून अधिक किमतीच्या सुमारे 30 व्हीआयपी कार खरेदी करण्याचा घाट घातला आहे.
यासंदर्भात एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एका उच्चस्तरीय समितीने व्हीआयपी मंडळींसाठी उपलब्ध असलेल्या वाहनांची तपासणी केल्यानंतर 15 जिल्ह्यांसाठी एकूण 30 वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. खरेदी करण्यात येणाऱ्या वाहनांपैकी पाच कार पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे ठेवण्यात येतील. तर नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी तीन कार देण्यात येतील. उर्वरित वाहने 12 जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात येतील. ही वाहने राज्यमंत्रिमंडळातील सदस्य आणि व्हीआयपी मंडळींना सरकारी दौऱ्यांसाठी देण्यात येतील."
दरम्यान, ही वाहनखरेदी योग्य असल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे. त्यांनी सांगितले की जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली बहुतांश वाहने ही चालवण्याच्या स्थितीमध्ये नव्हती. त्यांच्या दुरुस्तीची गरज होती. मात्र या दुरुस्तीवर मोठ्या प्रमाणाव खर्च होणार होता. त्यामुळे जुन्या वाहनांच्या दुरुस्तीऐवजी नवी वाहने खरेदी करणे आवश्यक आहे," मात्र या वाहन खरेदीवर राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्याच्या डोक्यावर 4.6 कोटींचे कर्ज असताना नव्याने वाहन खरेदी करण्याची गरज काय? ही सरकारी तिजोरीची सरळ सरळ उधळपट्टी आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.