...हा तर बाळासाहेबांचा अपमान! बंद खोलीतील चर्चेवरून संजय राऊतांचे अमित शहांना जोरदार प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 10:42 AM2019-11-14T10:42:43+5:302019-11-14T10:50:56+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा करणारे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई - देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही, अशी विचारणा करणारे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अमित शहा यांनी बंद खोलीमध्ये झालेल्या चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला आहे. मात्र ही चर्चा ज्या बंद खोलीत झाली ती भाजपासाठी केवळ एक खोली असेल. मात्र आमच्यासाठी मंदिरासारखी आहे. आमचे श्रद्धास्थान आहे. येथे झालेली चर्चा नाकारणे हा बाळासाहेबांचा अवमान आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, असे संजय राऊत म्हणाले.
अमित शहांनी 50-50 फॉर्म्युल्याबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, ''महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. पंतप्रधान मोदी व मी तसे जाहीर केले होते. तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही, असे वक्तव्य अमित शाहा यांनी केले आहे. मात्र पंतप्रधानांना खोटे पाडण्याची आमची इच्छा नव्हती. तसेच केले असते तर तो या देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला असता. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांपेक्षा आम्ही मोदींचा आदर करतो. त्यामुळे आम्ही हस्तक्षेप केला नाही. मात्र आम्हीही शिवसेनेच्या मुख्यमंत्रिपद आणि सत्तेच्या समसमान वाटपाचा आम्ही वारंवार उल्लेख करत होतो. तेव्हा अमित शहा यांनी हे का नाकारले नाही''
यावेळी बाळासाहेबांच्या खोलीत झालेल्या चर्चेवरून राऊत यांनी भाजपावर जोरदार टोला लगावला.''सत्तेच्या वाटपाबाबत ज्या खोलीत चर्चा झाली ती खोली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. या खोलीमधूनच बळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा अनेकदा दिला होता. तसेच मोदींसह अनेक बड्या नेत्यांना आशीर्वाद दिला होता. आता तीत चर्चा नाकारणे हा बाळासाहेबांचा अवमान आहे. या खोलीतच मुख्यमंत्रिपदासह सत्तेच्या समसमान वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता, हे मी बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो.
आता बंद खोलीमधील चर्चा बाहेर कशा आल्या अशी विचारणा भाजपावाले करत आहेत. मात्र बंद खोलीतल्या चर्चा बाहेर का आल्या. तुम्ही ती चर्चा आणि ठरलेली गोष्ट मान्य केली असती तर बंद खोलीत झालेली चर्चा बाहेर आली नसती. बंद दाराआड झालेल्या चर्चेचा विषय हा दिल्या घेतल्या शब्दाचा आणि वचनाचा होता. महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा होता. स्वाभिमानाचा होता, असेही संजय राऊत म्हणाले.