Maharashtra Government: 'संजय राऊत गल्लीतल्या कुजक्या म्हाताऱ्यासारखा'; निलेश राणेंची खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 12:46 PM2019-11-19T12:46:42+5:302019-11-19T14:44:46+5:30
Maharashtra News : शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपाने शिवसेनेला एनडीएतून बाजुला केले असून लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था केली आहे. यावर संजय राऊत यांनी टीका केली होती.
मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेवरून भाजपा आणि शिवसेनेत मोठी दरी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पदाच्या वादातून शिवसेनेने राष्ट्रवादी, काँग्रेसची साथ पकडली. यामुळे निवडणुकी दरम्यान भाजपात प्रवेश करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
शिवसेनेच्या एकमेव केंद्रीय मंत्र्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे भाजपाने शिवसेनेला एनडीएतून बाजुला केले असून लोकसभा आणि राज्यसभेतही वेगळी आसनव्यवस्था केली आहे. तसेच एनडीएच्या बैठकींनाही शिवसेनेला बोलावले नाही. यामुळे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी यावर आगपाखड केली होती. भाजपाने शिवसेनेशी युती तोडून देशाच्या राजकारणातील आपला सर्वात मोठा मित्रपक्ष गमावला आहे. भविष्यात भाजपाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. तसेच एनडीएतून शिवसेनेला बाहेर काढणारे तुम्ही कोण, असा सवालही केला आहे.
यावर माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करायची आणि एनडीएची बैठक नाकारायची. संजय राऊत हे गल्लीतल्या कुसक्या म्हाताऱ्यासारखे आहेत. जे सगळे ठीक असले तरीही सोसायटीच्या वॉचमनशी उगाच हुज्जत घालत बसतात, अशी टीका केली आहे.
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागली. ‘’महाराष्ट्राचा विचार केल्यास येथे भाजपाला शिवसेने उभे केले, जागा दिली. शिवसेना ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्वात जुन्या सदस्यांपैकी एक होती. मात्र आता भाजपाने शिवसेनेच्या संसदेतील खासदारांची आसनव्यवस्था बदलली आहे. भाजपाने युती तोडून आपला जुना आणि सर्वात मोठा मित्र पक्ष गमावला आहे. याची किंमत भाजपाला भविष्यात मोजावी लागेल,’’असे संजय राऊत म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासोबत युती करण्याची शिवसेनेची इच्छा नव्हती. मात्र अमित शाह मातोश्रीवर आले आणि युतीबाबत बोलणी केली. असेही राऊत म्हणाले.