Coronavirus Restrictions in Maharashtra : आज मध्यरात्रीपासून राज्यात जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू होणार, गाईडलाईन जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 07:28 PM2021-03-27T19:28:56+5:302021-03-27T20:03:32+5:30
Maharashtra Government Extends Covid-19 Related Restrictions Till April 15 : उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.
मुंबई: राज्यातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने लॉकडाऊन संदर्भात नव्याने गाइडलाइन जारी केल्या आहेत. त्यानुसार येत्या 15 एप्रिलपर्यंत पुन्हा काही निर्बंध कडक करण्यात आले आहेत. उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते पहाटे 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच चौपाट्या, उद्याने, मॉल, सिनेमागृह यासाठीही सरकारने अनेक निर्बंध घातले असून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आली आहे. (CoronaVirus : Mission Begin Again : Maharashtra Government Extends Covid-19 Related Restrictions Till April 15)
नव्या गाईडलाईननुसार, उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. याचबरोबर, विना मास्क फिरणाऱ्यांना दंड आकारण्यात येणार आहे. तसेच, बाहेर 6 फुटांचे अंतर राखणे गरजेच आहे, गर्दीच्या ठिकाणी थुंकल्यास दंड वसुल करण्यात येणार आहे. तसेच, खासगी कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा पर्याय उपलब्ध करुन द्यावा, असेही या आदेशात नमूद केलं आहे.
जाणून घ्या, नव्या गाईडलाईन...
- उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत उद्याने आणि चौपाट्यांसह सर्व सार्वजनिक स्थळे बंद राहतील.
- या ठिकाणी कुणीही नियमांचं उल्लंघन केल्यास प्रत्येक व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारला जाणार आहे.
- उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. या नियमाचं उल्लंघन केल्यास प्रत्येकी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.
- मास्कशिवाय फिरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारण्यात येणार असून सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.
- सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक कार्यक्रमांना कोणतीही परवानगी राहणार नाही. नाट्यगृहे आणि हॉल अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी वापरता येणार नाहीत. अशा प्रकारे कुणी कार्यक्रम केल्यास कारवाई करमअयात आली.
- संबंधित नाट्यगृह किंवा हॉलची मालमत्ता कोरोना काळ संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
- उद्या रात्री 8 वाजल्यापासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत सर्व सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रिन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.
- होम डिलिव्हरी आणि हॉटेलच्या वेळेलाही या नियमांचं बंधन असणार आहे. मात्र, होम डिलिव्हरी सुरू राहणार आहे. घालून दिलेल्या नियमांचं हॉटेल, रेस्टॉरंट, सिनेमागृह किंवा मल्टिप्लेक्सच्या मालकांनी उल्लंघन केल्यास ही सर्व स्थळे कोरोना संकट संपेपर्यंत बंद ठेवण्यात येतील.
- लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई केली जाईल.
- अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी राहील. त्यापेक्षा अधिक लोक एकत्र आल्यास कारवाई करण्यात येईल.
- धार्मिक स्थळ आणि त्यांच्या ट्रस्टींनी कमीत कमी भाविकांना मंदिरात दर्शन कसे देता येईल यावर लक्ष केंद्रीत करणे. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडणार नाही याची खबरदारी घ्यावी. ऑनलाईन दर्शनाची सुविधा देण्यात यावी. तसेच, मंदिरात येणाऱ्यांनी कोरोना नियमांची त्रिसूत्री पाळली की नाही ते पाहूनच त्यांना मंदिरात प्रवेश देणे.
- काही बंधनांसह सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल. मात्र त्यांनी नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपये दंड आकारला जाईल.
- खासगी आस्थापना ( आरोग्य व आवश्यक सेवा वगळून) ५० टक्केपर्यंत कर्मचारी उपस्थित ठेवता येतील तर शासकीय व निमशासकीय कार्यालयांना त्यांचे विभाग किंवा कार्यालय प्रमुख कोविड परिस्थिती विचारात घेऊन उपस्थितीबाबत कर्मचारी संख्या निश्चित करतील.
- कोरोना रुग्ण असल्याबाबत संबंधित स्थळी दरवाज्यावर 14 दिवसांसाठी तसा सुचना फलक लावण्यात येईल. गृह विलगीकरण शिक्काही रुग्णाच्या हातावर मारण्यात येईल.
विनाकारण रस्त्यांवर फिरू नका
मुंबईत रविवारपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. जर कोणतीही व्यक्ती विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसली तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. ही बाब ध्यानात घेता मुंबई महानगरपालिकेचे मार्शल रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता होळीच्या वेळीही कोरोनाच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.