CoronaVirus News: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खासगी रुग्णालयांच्या मनमानी दराला चाप; मुख्यमंत्र्यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 07:02 AM2021-06-02T07:02:35+5:302021-06-02T07:03:57+5:30

शहरांच्या वर्गीकरणानुसार आकारणार शुल्क, दरांबाबत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे उद्धव ठाकरे यांनी दिले निर्देश

Maharashtra government fixes Covid 19 treatment cost in private hospitals | CoronaVirus News: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खासगी रुग्णालयांच्या मनमानी दराला चाप; मुख्यमंत्र्यांचे आदेश

CoronaVirus News: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! खासगी रुग्णालयांच्या मनमानी दराला चाप; मुख्यमंत्र्यांचे आदेश

Next

मुंबई : खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांच्या उपचाराचे दर स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निश्चित केले असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. खासगी रुग्णालयांच्या लुटीला चाप बसणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी निश्चित करून दिलेल्या दरापेक्षा अधिक एक पैसाही कोणत्याच खासगी रुग्णालयाला आकारता येणार नाही. या दरांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. शहरांचे वर्गीकरण करून त्यानुसार नवे दर निश्चित करण्यात आले आहेत. सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या दराबाबतचा प्रस्ताव दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपचारांवरील दरांबाबत गावे व शहरांचे वर्गीकरण करण्याचे ठरले व तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात आला. त्यास मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मान्यता दिली.

यापूर्वी उपचारांचे दर हे मोठ्या शहरांतील रुग्णालये व अति दुर्गम भागातील रुग्णालये यासाठी एकच होते. शहरांच्या वर्गीकरणामुळे आता उपचारांच्या खर्चात मोठा दिलासा मिळणार आहे. विमा कंपन्या आणि विविध प्रकारचे भत्ते देताना ज्याप्रमाणे शहरांचे वर्गीकरण केले जाते. त्याच निकषावर वर्गीकरण आणि संबंधित उपचारांचे दर निश्चित केल्याने, विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांवरील उपचारांचा खर्च तुलनेने कमी होणार आहे.
रुग्णाला संबंधित रुग्णालयाने पूर्वलेखापरिक्षित (प्रीऑडिटेड) देयक देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

...असे असतील कोरोना उपचाराचे दर (उपचाराचे सर्व दर प्रतिदिवस याप्रमाणे)
वॉर्डमधील नियमित विलगीकरण
अ वर्ग शहरांसाठी ४००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ३००० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी २४०० रुपये. यामध्ये आवश्यक ती देखरेख, नर्सिंग, चाचण्या, औषधी, बेड्सचा खर्च व जेवण याचा समावेश. 
कोरोना चाचणीचा खर्च निश्चित केलेल्या दराप्रमाणे द्यावा लागेल. केवळ मोठ्या चाचण्या व तपासणी तसेच उच्च पातळीवरील मोठी औषधी यातून वगळली आहेत.

व्हेंटिलेटरसह आयसीयू 
अ वर्ग शहरांसाठी ९००० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ६७०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ५४०० रुपये.

केवळ आयसीयू व विलगीकरण
अ वर्ग शहरांसाठी ७५०० रुपये, ब वर्ग शहरांसाठी ५५०० रुपये आणि क वर्ग शहरांसाठी ४५०० रुपये
अ वर्ग शहरांत मुंबई तसेच महानगर क्षेत्र (भिवंडी, वसई - विरार वगळून), पुणे तसेच पुणे महानगर क्षेत्र, नागपूर (नागपूर मनपा, डिगडोह, वाडी).
ब वर्ग शहरांत नाशिक, औरंगाबाद, अमरावती, भिवंडी, सोलापूर, कोल्हापूर, वसई-विरार, सांगली, मालेगाव, नांदेड, सर्व जिल्हा मुख्यालये.
क वर्ग भागात अ आणि ब वर्ग शहरांव्यतिरिक्तच्या इतर सर्व शहरांचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra government fixes Covid 19 treatment cost in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.