महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2024 03:02 PM2024-10-12T15:02:59+5:302024-10-12T15:12:08+5:30

होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Government issued decision to double the salary of 50 thousand home guards in the state | महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा

महाराष्ट्रातील होमगार्ड्सना देशात सर्वाधिक मानधन; दुप्पट रकमेची फडणवीसांकडून घोषणा

Devendra Fadnavis : राज्य सरकारने दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्यातील होमगार्ड्ससाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने काही दिवसांपूर्वी होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.  दसऱ्याच्या निमित्ताने या निर्णयाच्या अमंलबजावणीला सुरुवात झाली आहे. सरकारकडून या निर्णयाबबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. यासह देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील समस्त होमगार्ड्सना शुभेच्छा दिल्या आहेत. 

राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या बरोबरीने काम करणाऱ्या होमगार्ड्ससाठी सरकारने दसऱ्याच्या निमित्ताने आनंदाची बातमी दिली आहे. होमगार्ड्सकडून त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अखेर होमगार्ड्सच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता या निर्णयाची अंमलबजावणी करणारा शासन निर्णय सरकारकडून जारी करण्यात आला आहे.  दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानधनात वाढ झाल्याचा शासन आदेश जारी केल्याची माहिती दिली.

"राज्यातील होमगार्ड्सचे मानधन जवळजवळ दुप्पट करण्यासंबंधीचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. प्रतिदिन ५७० रुपयांवरून ते आता 1083 रुपये इतके करण्यात आले आहे. आता हे मानधन देशात सर्वाधिक आहे. याशिवाय विविध भत्त्यांची रक्कम सुद्धा दुप्पट करण्यात आली आहे. उपहार भत्ता १०० वरून २०० रुपये तर भोजन भत्ता १०० वरून २५० रुपये इतका करण्यात आला आहे. राज्यातील सुमारे ५५,००० होमगार्डना या निर्णयाचा लाभ मिळेल. १ ऑक्टोबर २०२४ पासून ही वाढ देण्यात येईल. गेल्याच महिन्यात सुमारे ११,२०७ होमगार्ड्सची भरती प्रक्रिया सुद्धा पूर्ण करण्यात आली आहे. सद्या त्यांचे प्रशिक्षण करण्यात येते आहे," असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, १ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील होमगार्ड यांच्या भत्त्यात भरीव वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीत राज्यातील होमगार्ड्सचे मानधन दुप्पट करण्यात आले. या निर्णयानंतर राज्यातील  होमगार्ड्सना इतर राज्यातील होमगार्ड्सच्या तुलनेपेक्षा सर्वाधिक मानधन मिळणार आहे.

Web Title: Maharashtra Government issued decision to double the salary of 50 thousand home guards in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.