Maharashtra Government: शिवसेनेने जनतेचा अपमान केला: महादेव जानकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 12:31 PM2019-11-27T12:31:59+5:302019-11-27T12:48:48+5:30
मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून जो दावा केला जात होता, तसा शब्दच भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी त्यांना दिला नव्हता असेही जानकर म्हणाले.
मुंबई : राज्यात महा विकास आघाडीची सत्तास्थापन होणार असल्याचे निश्चित झाले असून, भाजप आणि त्यांचा मित्रपक्षांना विरोधात बसावे लागणार आहे. तर यावरूनच रासपचे प्रमुख नेते महादेव जानकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेत बसण्याचे कौल दिले असताना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केल्याने हा जनतेचा अपमान असल्याचे जानकर म्हणाले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना जानकर म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत होतो. त्यामुळे आत्ता सुद्धा आम्ही त्यांच्या सोबतच राहणार असून त्यासाठी विरोधात बसण्याची वेळ आली तरीही चालेल. तसेच पुढे सत्ता आल्यास पुन्हा सत्तेत बसू, असे जानकर म्हणाले. तर याचबरोबर त्यांनी शिवसेनेवर सुद्धा टीका केली.
विधानसभा निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून जनते समोर गेलो होतो. त्यामुळे राज्यातील मतदारांनी महायुतीला सत्तेत बसण्याचा कौल दिला होता. मात्र शिवसेनेने जनतेचा अपमान करण्याची भूमिका घेतली, ती बरोबर नसल्याचे जानकर म्हणाले. महायुतीत निवडणूक लढवून त्यांनी ऐनवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी केली असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
तसेच मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेकडून जो दावा केला जात होता, तसा शब्दच भाजपच्या कोणत्याही नेत्यांनी त्यांना दिला नव्हता असेही जानकर म्हणाले. त्यामुळे शिवसेनेने असंघाशी संघ नको करायला पाहिजे होते. तर भाजप-शिवसेना एकत्र यावे म्हणून उद्धव ठाकरे यांची पाच वेळा भेट घेण्याचा मी प्रयत्न केला. मात्र अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद द्यायला तयार असेल तरच भेटीला या असे त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. असा दावा सुद्धा जानकर यांनी यावेळी केला.