Maharashtra Government: पत्त्यांचा क्लब, शिवसेना आणि राष्ट्रवादी; राज ठाकरेंची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 08:03 AM2019-11-22T08:03:10+5:302019-11-22T08:11:53+5:30
दोन वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल
मुंबई: राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार येणार हे जवळपास स्पष्ट झालं आहे. दिल्लीतून काँग्रेस श्रेष्ठींनी सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील दाखवल्यावर आता पुढील चर्चेसाठी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रत्येकी तीन नेत्यांची मुंबईत बैठक होणार आहे. यामध्ये सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होईल. याच पार्श्वभूमीवर काल रात्री उशिरा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी वर्तवलेलं भाकीत खरं ठरण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी नाशिकमधील एका सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय भविष्यावर भाष्य केलं होतं. 'भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका एकत्र लढवणार आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार... हा काय पत्त्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला’’, असं राज ठाकरे म्हणाले होते. ज्यावेळी शिवसेनेचे मंत्री आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, असं जाहीरपणे सांगत होते, त्यावेळी राज यांनी हे विधान केलं होतं.
भाजपासोबत विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या शिवसेनेनं आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. या तिन्ही पक्षांमध्ये सध्या बैठकांचं सत्र सुरू आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनीदेखील हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे आता तीन पक्षांची मंत्रिपदांच्या वाटपावर चर्चा होईल. यानंतर त्यांच्याकडून सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. शिवसेना राष्ट्रवादी, काँग्रेससोबत गेल्यामुळे सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागेल.