भाजप फोडाफोडीचे राजकारण करत असल्याची राणेंची कबुली ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 12:01 PM2019-11-25T12:01:24+5:302019-11-25T12:56:20+5:30
भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असे चंद्रकांत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
मुंबई : राजकीय घडामोडी पाहता बहुमत सिद्ध करण्याइतके पाठबळ मिळवण्यासाठी भाजपला धडपड करावी लागणार आहे. त्यामुळे भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर बाजारात अनेक आमदार आहेत त्यामुळे एक, दोन आमदार परत गेल्याने फरक पडणार नाही असे वक्तव्य भाजपा खासदार नारायण राणे यांनी केल्याने भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केले जाणार असल्याची ही कबुलीचं असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.
भाजपने शनिवारी अजित पवारांच्या मदतीने सत्तास्थापन केल्याने राजकीय वर्तुळात भूकंपाचे हादरे बसले आहे. त्यांनतर अनके आमदार अजित पवार यांच्या सोबत असल्याचे चर्चा पाहायला मिळत होती. मात्र हे आमदार पुन्हा शरद पवारांच्या बाजूने उभे राहत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर अजित पवारांनी त्यांना फसवून शपथविधीला नेले असल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून करण्यात आले होते.
तर याच मुद्यावर बोलताना नारायण राणे यांनी, फसवून शपथविधीला जायला ते आमदार लहान आहेत का? बाजारात अनेक आमदार आहेत त्यामुळे एक, दोन आमदार परत गेल्याने फरक पडणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केले जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले असल्याचे बोलले जात आहे.
कोणत्याही पक्षाचे आमदार फोडणे ही आमची संस्कृती नाही. जे नेते आमच्यासोबत आले आहेत ते फक्त विकासाची दूरदृष्टी ठेवून आले. भाजप कोणत्याही पक्षाचा आमदार फोडणार नाही, असे चंद्रकांत पाटील हे काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. मात्र बाजारात अनेक आमदार असल्याचे वक्तव्य राणेंनी केल्याने व 'ऑपरेशन लोटस' मोहीम आखण्यात आल्याच्या चर्चेने भाजपकडून फोडाफाडीचे राजकरण केले जाऊ शकतात असे बोलले जात आहे.