President Rule : राष्ट्रपती राजवट कधी आणि कशी लागू होते?... जाणून घ्या घटनेतील तरतूद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 06:16 PM2019-11-12T18:16:26+5:302019-11-12T18:21:53+5:30
President Rule In Maharashtra : सत्तेचा तिढा कायम असल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू
मुंबई : शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करायची नाही, अशी भाजपानं घेतलेली भूमिका, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करण्यात शिवसेनेला आलेलं अपयश यामुळे सत्तासंघर्षाचा पेच निकालानंतर जवळपास तीन आठवडे होत आले तरी कायम राहिला. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून राज्यातील चार पक्ष सत्ता स्थापनेसाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत होते. बैठका, गाठीभेठींचं सत्र सुरू होतं. मात्र कोणालाही सत्ता स्थापन करण्यात यश आलं नाही.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वप्रथम सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपाला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मात्र बहुमताचा आकडा गाठिशी नसल्यानं सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याचं भाजपानं जाहीर केलं. यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असलेल्या शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी बोलावण्यात आलं. मात्र त्यांनाही बहुमताची जुळवाजुळव करता आलं नाही. राष्ट्रवादीलादेखील बहुमताचा दावा करता आला नाही. यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे.
राष्ट्रपती राजवट केव्हा, कशी?
राज्यघटनेच्या अनुच्छेद ३५६ अन्वये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची तरतूद आहे. राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालत नसल्याची किंवा तसा चालवणं अशक्य असल्याची राष्ट्रपतींची खात्री होणं हा यासाठी मुख्य निकष आहे. नवी विधानसभा अस्तित्वात आल्यावर ज्याला बहुमताचा पाठिंबा आहे, असं लोकनियुक्त सरकार अधिकारावर आणणं ही राज्यपालांची संवैधानिक जबाबदारी आहे. कोणत्याही कारणानं नवं सरकार स्थापन होऊ न शकणं हे राज्याचा कारभार राज्यघटनेनुसार चालवता न येण्याचंच द्योतक ठरतं.
अशा वेळी राज्यपाल राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतात. मात्र कोणत्याही परिस्थितीत नवं सरकार स्थापन होईपर्यंत आधीच्या विधानसभेतील बहुमताच्या आधारे सत्तेवर आलेलं सरकार मुदत संपल्यानंतर सत्तेवर राहू शकत नाही.