मंत्रालयासह होणार परिसराचा पुनर्विकास, तत्त्वत: मान्यता; लवकरच प्रस्ताव
By यदू जोशी | Published: November 30, 2023 06:57 AM2023-11-30T06:57:11+5:302023-11-30T06:58:03+5:30
Maharashtra Government: मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
- यदु जोशी
मुंबई - मंत्रालय, विधानभवन, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले यासह संपूर्ण परिसराचा पुनर्विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी तत्त्वत: मान्यता देण्यात आली. लवकरच यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली जाणार आहे.
चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनासंदर्भात वास्तुविशारद पी. के. दास यांनी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरण केले. त्यावेळी मंत्रालय पुनर्विकासाचीही संकल्पना त्यांनी मांडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ती उचलून धरली. मंत्रालयाला २१ जून २०१२ रोजी लागलेल्या आगीनंतरच पुनर्विकास व्हायला हवा होता. सध्याची गरज लक्षात घेता असा पुनर्विकास करणे अत्यंत गरजेचे आहे, असा मंत्रिमंडळाचा सूर होता.
ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी समिती
पुनर्विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार करण्यासाठी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे. पुढची ५० वर्षे उपयुक्त राहील, अशी इमारत उभारण्यावर भर दिला जाईल.
एकच भव्यदिव्य इमारत उभारणार?
मंत्रालयाची मुख्य इमारत, विस्तारित इमारत, आकाशवाणी आमदार निवास, प्रशासकीय इमारत, मंत्र्यांचे बंगले, सचिवालय जिमखाना, शासकीय निवासस्थाने तसेच विधानभवन पाडून एकच भव्य परिसर उभारण्याची शक्यता आहे.