Maharashtra Government: शिवसेना-भाजपामधील तिढा सोडवण्यासाठी संघाचा पुढाकार; पण ठाकरे म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 08:44 PM2019-11-24T20:44:42+5:302019-11-24T21:02:32+5:30
आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण माहिती
मुंबई: भाजपा आणि शिवसेनेमधील दरी दिवसागणिक रुंदावत आहेत. शिवसेनेनं एनडीएमधून बाहेर पडत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन पक्षांमध्ये समेट घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी याबद्दलची माहिती आमदारांच्या बैठकीत दिली. भाजपा आणि शिवसेनेला एकत्र आणण्यासाठी संघातील काहींनी प्रयत्न केले. मात्र मी त्यात फारसा रस दाखवला नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
फोडाफोड टाळण्यासाठी शिवसेनेनं सर्व आमदारांना मुंबईतील ललित हॉटेलमध्ये ठेवलं आहे. या आमदारांची आज उद्धव ठाकरेंनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आमदारांशी संवाद साधत सरकार आपलंच येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी उद्धव यांनी संघाचाही उल्लेख केला. 'भाजपाशी पुन्हा जुळवून घेण्यासाठी संघानं पुढाकार घेत संपर्क साधला. मात्र आता खूप उशीर झाल्याचं मी त्यांना सांगितलं. शरद पवार आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचंच सरकार येईल असं मी संघाला सांगितलं', असं उद्धव ठाकरेंनी आमदारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
उद्धव ठाकरेंपाठोपाठ राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीदेखील आपण भाजपासोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. मी राष्ट्रवादीतच असून कायम राष्ट्रवादीतच राहणार आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचे नेते आहेत, असं ट्विट अजित पवारांनी केलं आहे. त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार नसल्याचं म्हटलं. भाजपासोबत न जाता शिवसेना आणि काँग्रेससोबत राहण्याचा निर्णय राष्ट्रवादीनं घेतला आहे. राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करेल. अजित पवारांचं विधान खोटं आणि दिशाभूल करणारं आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, अशा शब्दांत शरद पवारांनी अजित पवारांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिलं.