Maharashtra Government: उद्धव ठाकरे-शरद पवारांमध्ये 1 तास चर्चा; सत्ता स्थापनेसाठी वेगवान घडामोडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 11:30 PM2019-11-21T23:30:17+5:302019-11-22T06:23:17+5:30
शरद पवार दिल्लीहून परतताच उद्धव ठाकरे त्यांच्या निवासस्थानी; आदित्य ठाकरे, संजय राऊतदेखील बैठकीला उपस्थित
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार दिल्लीहून मुंबईत रात्री आले. लगेचच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांना सोबत घेऊन शरद पवार यांचे सिल्वर ओक निवासस्थान गाठले. ही भेट पूर्वनियोजित होती.
दिल्लीतच या भेटीची तयारी झाली होती. तसा निरोपही मातोश्रीवर देण्यात आला होता. दिल्लीत दोन दिवस झालेल्या विविध बैठकांमध्ये काय ठरले याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. आज सकाळी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या आमदारांना भेटणार आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन पक्षांची उद्याची बैठक ही औपचारिक बैठक ठरावी आणि सगळ्या गोष्टी आधीच ठरवून घ्याव्यात या दृष्टीने गेले दोन दिवस दिल्लीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बैठका घेतल्या.
त्यापाठोपाठ मुंबईत परत येताच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही त्या बैठकीतील चर्चेची माहिती देण्यात आली. त्यामुळे उद्याची बैठक ही केवळ औपचारिकता असेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने स्पष्ट केले.