Maharashtra Government: इतकी नाचक्की कोणत्याच पक्षाची झाली नव्हती; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 07:51 AM2019-11-27T07:51:10+5:302019-11-27T07:52:44+5:30

शिवसेनेकडून भाजपाचा खरपूस समाचार

maharashtra government shiv sena hits out at bjp after devendra fadnavis resigns as cm | Maharashtra Government: इतकी नाचक्की कोणत्याच पक्षाची झाली नव्हती; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

Maharashtra Government: इतकी नाचक्की कोणत्याच पक्षाची झाली नव्हती; शिवसेनेचा भाजपावर हल्लाबोल

Next

मुंबई: बहुमत चाचणीला सामोरं न जाताच फडणवीसांचं सरकार पळून गेलं. इतकी नाचक्की महाराष्ट्रात कोणत्याच सरकारची व राजकीय पक्षाची झाली नव्हती, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्रातील एक मस्तवाल हैदोस थांबला. आता सर्व शुभ घडेल, असा विश्वास शिवसेनेनं सामनामधून व्यक्त करण्यात आला आहे. 

सगळ्यांच्या वल्गना हवेतच विरल्या. शेवटी देवेंद्र फडणवीसांचं औटघटकेचं राज्य विश्वासदर्शक ठरावाला सामोरं न जाताच कोसळलं. ज्यांच्या पाठिंब्यावर फडणवीस यांनी सरकार स्थापनेचा दावा केला, त्या अजित पवार यांनी सगळ्यात आधी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला व अजित पवारांच्या पाठीशी दोन आमदारही उरले नाहीत हे पक्के झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनाही जावे लागले. भ्रष्ट आणि बेकायदा मार्गानं महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेलं सरकार फक्त ७२ तासांत गेलं. बहुमताचा साधा आकडा नसतानाही फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, हा पहिला गुन्हा व ज्यांच्या पाठिंब्यावर शपथ घेतली त्या अजित पवारांवरील भ्रष्टाचाराचे सर्व गुन्हे चार तासांत मागे घेतले, हा दुसरा गुन्हा. या गुन्ह्यांसाठी जागा निवडली मुंबईच्या राजभवनाची. जेथे संविधानाचं रक्षण व्हावं, त्या संविधानाच्या संरक्षकांनीच या गुन्ह्यांस कवच दिलं. त्यामुळे आज ज्यांनी संविधान दिवस साजरा करण्याचं ढोंग केलं त्यांनाही सर्वोच्च न्यायालयानं चपराक मारली आहे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर तोफ डागली.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा करताना शिवसेनेवर सत्तेसाठी लाचार झाल्याची टीका केली. त्या टीकेचादेखील शिवसेनेनं समाचार घेतला आहे. फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. शिवसेनेस सत्तेसाठी लाचार म्हणणाऱ्यांनी स्वत:च्या अंतरंगातील जळमटं आधी पाहावीत. अजित पवारांशी त्यांनी 'पाट' लावलेला चालतो, पण शिवसेनेस जे घ्यायचं ठरलं होतं, त्यावर पलटी मारून काय मिळवलं, असा सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी वगैरे २०१४ साली राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपानं घेतला होता तेव्हा ती लाचारी नव्हती. मग आता लाचारी कसली? भाजपचं वैफल्य असं आहे की इतर राज्यांत जे करू शकले ते त्यांना महाराष्ट्रात घडवता आलं नाही. महाराष्ट्रानं दबाव झुगारला व आमदारांनी स्वाभिमान राखला. महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. येथे स्वाभिमानाचा ज्वालामुखी सदैव उसळत असतो. या स्वाभिमानाला डिवचण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा झाला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रानं पाणी दाखवलं. महाराष्ट्रात भाजपनं सत्तेसाठी इतकं अगतिक का व्हावं?, असा सवाल शिवसेनेनं उपस्थित केला आहे. 
 

Web Title: maharashtra government shiv sena hits out at bjp after devendra fadnavis resigns as cm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.