Maharashtra Government : शिवसेनेच्या आमदारांचे वऱ्हाड चालले जयपूरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 08:28 PM2019-11-21T20:28:50+5:302019-11-21T20:29:23+5:30
राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-मनोहर कुंभेजकर
मुंबई: गेल्या 24 एप्रिलला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला.मात्र सुमारे तीन आठवड्यानंतर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आता लवकर सुटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. राज्यात शिवसेना-काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिवआघाडीच्या सत्तेची बोलणी अंतिम टप्यात असून शिवआघाडीचे सरकार लवकर सत्तेवर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या पाश्र्वभूमीवर कोणताही दगाफटका होऊ नये याची काटेकोरपणे काळजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे.शिबसेनेच्या विजयी आमदारांना उद्या शुक्रवार दि,22 रोजी सकाळी 10 वाजता मातोश्री येथे बोलावले आहे.आमदारांची बैठक झाल्यानंतर शिवसेनेचे विजयी आमदार व शिवसेनेला पाठिंबा देणारे 7 अपक्ष आमदार किमान 4 ते 5 दिवस जयपूरला जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शिवसेनेच्या आमदारांना 4-5 दिवसांचे कपडे,ओळखपत्र म्हणून पॅनकार्ड व आधारकार्ड घेऊन येण्याचे आदेश मातोश्रीकडून देण्यात आले आहे. यापूर्वी शिवसेनेचे आमदारांना दि. 9 नोव्हेंबर ते दि. 13 नोव्हेंबर पर्यत मालाडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते,तर त्यापूर्वी दोन दिवस हे आमदार वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा मध्ये होते.मात्र यावेळी आमदारां बरोबर त्यांचे खाजगी सचिव, अंगरक्षक, जवळचे कार्यकर्ते असा लवाजमा होता. मात्र जयपूर दोऱ्याच्यावेळी फक्त आमदाराचा लवाजमा नसेल आणि फक्त आमदारच असतील असे समजते.मात्र उद्या किती वाजता जयपूरला जाणार, विमानाने का वातानुकूलीत बसने जयपूरला जाणार याची काही माहिती शिवसेनेच्या आंमदरांकडे नसल्याचे समजते.
जयपूर हे ठिकाण शिवसेनेच्या दृष्टीने सेफ असून यापूर्वी कॉंग्रेसच्या 44 विजयी आमदारांना काँग्रेस पक्षश्रेष्टींनी जयपूरला ठेवले होते. त्यात राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आहे.तर गोवा येथे भाजपा सरकार असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून गोवा एवजी उद्धव ठाकरे यांनी आपल्या आमदारांना ठेवण्यासाठी जयपूरची निवड केल्याचे समजते.