Maharashtra Government : शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 02:41 AM2019-11-22T02:41:09+5:302019-11-22T02:41:31+5:30
उद्धव काय बोलणार याबाबत उत्सुकता; मुुंबईबाहेर एकाच ठिकाणी ठेवले जाणार
मुंबई : शिवसेनेच्या आमदारांची बैठक शुक्रवारी सकाळी मातोश्रीवर होणार असून तीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय बोलणार या बाबत प्रचंड उत्सुकता आहे.
आमदारांना पाचसहा दिवसांच्या मुक्कामाच्या तयारीने या असे आदेश शिवसेनाभवनातून देण्यात आले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार आमदारांना मुंबईबाहेर एकत्रितपणे जयपूर येथे एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये ठेवले जाईल. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असे महाशिवआघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. त्यासाठी कुठला किमान समान कार्यक्रम निश्चित झाला आहे याची माहिती उद्धव उद्याच्या बैठकीत आमदारांना देतील, असे म्हटले जाते. कारण हिंदुत्वासह विविध मुद्यांवर शिवसेनेला नमते घ्यावे लागले असल्याची बाहेर चर्चा आहे.
आमदार पुन्हा एकत्रित
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आणि शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत एकत्रित ठेवण्यात आले होते. गेल्या आठवड्यात त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाण्याची मुभा देण्यात आली.
येत्या आठवड्यात महाशिवआघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात नक्कीच स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, शिवसेना आमदारांना पुन्हा एकत्रित ठेवले जाणार आहे.