"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 02:06 PM2024-06-03T14:06:30+5:302024-06-03T14:14:49+5:30

शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे.

Maharashtra government should take steps regarding drought situation Sharad Pawar warning | "आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा

"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी आता काही तासांचा अवधी उरला आहे. महाराष्ट्रातही सर्वांनाच निवडणुकीच्या निकालाबाबत उत्सुकता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे याकडे लक्ष लागलेलं आहे. एकीकडे निकालाची वाट पाहिली जात असताना महाराष्ट्रातदुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागात पाणीटंचाईमुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. अशातच आता राष्ट्रावादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारला पत्र लिहून इशारा दिला आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थितीची भीषणता पाहता शरद पवार यांनी सरकारने पावलं उचलली नाहीत तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असं म्हटलं आहे.

राज्यात सध्या उन्हाळ्यामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर दुष्काळाचा सामना करण्यासाठी सरकारकडून काय उपाययोजना करण्यात आल्या याची माहिती घेण्यासाठी काँग्रेसने विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती तयार करण्यात आली आहे. दुसरीकडे शरद पवार हे देखील आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला पत्र लिहून महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा दिला आहे.

"राज्यात दुष्काळामुळे जनजीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. पाण्याच्या टंचाईमुळे बळीराजा आणि सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जनावरांसाठी पाणी आणि चाऱ्याची कमतरता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या भीषणतेकडे राज्य सरकारचे लक्ष वेधूनही राज्य सरकारकडून कुठलीही ठोस भूमिका अद्याप घेण्यात आलेली नाही. जर ही दुष्काळाची स्थिती राज्यात कायम राहिली आणि जर राज्य सरकारकडून तातडीने पावलं उचलली गेली नाहीत तर, महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी नक्कीच संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल! त्यामुळे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी राज्यातील दुष्काळ निवारणाबाबत योग्य कार्यवाही करावी, ही अपेक्षा!," असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.
 

काय म्हटलंय शरद पवारांनी पत्रात?

मी मागील महिन्यात २४ मे रोजी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र राज्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. सदर पत्रकार परिषदेत मी राज्य सरकारशी सहकार्य करण्याची आणि दुष्काळी परिस्थितीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती. आपण देखील आदल्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवड्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र या महत्त्वपूर्ण बैठकीत संबंधित लोकप्रतिनिधी व मंत्री गैरहजर होते. आपण सदर बाबीची योग्य ती दखल घेतली असेलच. मात्र राज्य सरकार अध्यापही अंग झटकून कामाला लागल्याचे दिसत नाही, हे मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो. 

मागील १० दिवसांत दुष्काळी परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. राज्यातील उजनी, जायकवडी सारखी महत्त्वाची धरणे आटली आहेत. संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत आहे. त्याची झळ लगतच्या उत्तर महाराष्ट्र, विदर्भ विभागाला देखील बसली आहे. धुळे, नंदूरबार, नाशिक जळगाव, सोलापूर, अहमदनगर, यवतमाळ, अकोला, बुलढाणा जिल्ह्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील जनता पाण्यासाठी तहानलेली आहे. मराठवड्यासह पुणे जिल्ह्यातील पुरंदर, दौंड, बारामती, इंदापूर, सातारा जिल्ह्यातील माण-खटाव, कोरेगाव आणि सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी या तालुक्यांतील पाणीटंचाई परिस्थिती अधिक चिंताजनक आहे.

मागील वर्षी राज्यात केवळ ११०० टँकर्स होते. आजमितीस ती संख्या ११ हजारांच्या वर गेली असून टँकर्ससाठी पाणी भरण्याचे स्रोत शोधावे लागत आहेत. जनावरांना चारा आणि पाणी मिळणे कठीण झाले असून राज्यशासनाने फळबागा वाचविण्यासाठी अद्याप काहीच प्रयत्न केल्याचे दिसत नाही. दुष्काळ निवारणाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. राज्य सरकारने दुष्काळी परिस्थितीने हवालदिल झालेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी नवीन काही उपाययोजना देखील हाती घेतल्या नाहीत, हे दुर्देवाने नमूद करावेसे वाटते.

दुष्काळी परिस्थिती हाताळताना मी राज्य सरकारशी सातत्याने सहकार्याची भूमिका घेत आलो आहे. परंतु या भीषण दुष्काळी परिस्थितीत जनतेचे हाल पाहून स्वस्थ राहणे कठीण झाले आहे. दुष्काळ निवारणाच्या कामात राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत असे मी आवाहन करतो. मात्र त्यानंतरही काही आश्वासक बदल न दिल्यास मला संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, हे स्पष्टपणे नमूद करतो, असे शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
 

Web Title: Maharashtra government should take steps regarding drought situation Sharad Pawar warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.