महाराष्ट्र सरकारला मिळणार AI तंत्रज्ञानाचा आधार! Google सोबत झाला सामंजस्य करार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 07:10 PM2024-02-08T19:10:45+5:302024-02-08T19:11:52+5:30
महत्त्वाच्या सात क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा वापर केला जाणार
Maharashtra Government Google MOU, Devendra Fadnavis: महाराष्ट्र सरकारने आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले. कृषीक्षेत्र, आरोग्यसेवा आणि शिक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AIचा वापर करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी सर्च इंजिन कंपनी गुगलसोबत सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुगल इंडियाचे कंट्री हेड आणि उपाध्यक्ष संजय गुप्ता आणि राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या उपस्थितीत कंपनीच्या कार्यालयात स्वाक्षरी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती देताना फडणवीस म्हणाले, "काही आठवड्यांपूर्वी, मी संजय गुप्ता यांना भेटलो आणि AIचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होत आहे यावर आमची एक छोटीशी चर्चा झाली. त्यांनी मला माहिती दिली की त्यांची वेगवेगळी सेंटर्स वेगवेगळे क्षेत्रात नवे प्लॅटफॉर्म आणि ॲप्लिकेशन तयार करत आहेत, जे केवळ व्यवसायापुरतेच नव्हे तर लोकांचे जीवनमान बदलण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. त्याच वेळी मी नागपुरात सेंटर ऑफ एक्सलन्स सुरु करण्याच्या सरकारच्या योजनेबद्दल त्यांना सांगितले. त्या मुद्द्यावर आमची अधिक विस्तृत चर्चा झाली. तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनावर 'सकारात्मक परिणाम' करण्यासाठी आणि प्रक्रिया व प्रणालीला चालना देण्यासाठी केला पाहिजे, कारण यामुळे लोकांचे जीवन बदलू शकते. ही परस्पर फायदेशीर भागीदारी असू शकते या निष्कर्षावर पोहचलो. त्यातूनच आजचा महत्त्वाचा निर्णय झाला." गुगल आणि राज्य सरकार यांच्यात एकूण सात क्षेत्रांत एकत्रितपणे काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) वापराने कामे झटपट आणि कमी लोकांच्या उपस्थितीत करणे शक्य आहे. त्यामुळे या करारानंतर अनेक लोकांच्या जाणार का?, अशीही चर्चा आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट उत्तर दिले. "गुगल एक अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची टेक्नोलॉजी कंपनी आहे. या कंपनीचा जगभरात प्रचंड मोठा विस्तार आहे. टेक्नोलॉजीच्या क्षेत्रात ही कंपनी एक पाऊल पुढे राहिली आहे. गुगलने AI मध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं आहे. त्यामुळे त्यांनी लोकोपयोगी AI विचार मांडला आहे. त्यांची हीच शक्ती महाराष्ट्रात कशी वापरता येईल या संदर्भातील हा करार आहे. एआयमुळे रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्या संधींकरता आपले राज्य फ्युचर रेडी होतं आहे.”