Maharashtra Government : साहेब... तुम्हीच मुख्यमंत्री व्हा; शिवसेनेच्या आमदारांचे उद्धव ठाकरेंना साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 02:27 AM2019-11-23T02:27:58+5:302019-11-23T06:11:22+5:30
‘मातोश्री’वर शिवसेनेच्या आमदारांची बैठक
मुंबई : महाराष्ट्रात तब्बल २० वर्षांनंतर मुख्यमंत्रिपद शिवसेनेला मिळत असताना मुख्यमंत्री म्हणून तुम्हीच हवे आहाते, अशी भावना शिवसेनेच्या आमदारांनी शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली.
मातोश्रीवर झालेल्या बैठकीत आमदारांनी एकमुखाने मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव यांना गळ घातली. ही केवळ आमची इच्छा नाही तर राज्यातील तमाम शिवसैनिकांचीही तीच इच्छा आहे. त्या इच्छेचा आदर करून आपण मुख्यमंत्रिपद स्वीकारा, असे साकडे या आमदारांनी उद्धव यांना घातले. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस सरकारमध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री कोण असेल या बाबत तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच माजी मंत्री एकनाथ शिंदे, सुभाष देसाई आणि खा.संजय राऊत यांची नावे त्या संदर्भात घेतली जात आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी सुरुवातीला उद्धव ठाकरे, शिवसेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची नावे होती. मात्र, उद्धव यांचे नाव असल्याने आदित्य यांचे नाव मागे पडले. तीन पक्षांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपद सांभाळायचे तर आदित्य ते तूर्त पेलू शकणार नाहीत, यावर पक्षात एकमत होते. गेले काही दिवस आमदारांची मोट बांधणारे एकनाथ शिंदे, तीन पक्षांचे सरकार येण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे संजय राऊत आणि ज्येष्ठ नेते म्हणून सुभाष देसाई यांची नावेही चर्चेत आहेत. उद्धव हे मुख्यमंत्री होणार नसतील, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पसंती त्यांचे खास मानले जाणारे संजय राऊत यांच्या नावाला असेल.
सरकार तीन पक्षांचे असले तरी मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असल्याने सरकारचे नेतृत्व एका अर्थाने शिवसेनेकडे असेल. अशावेळी सरकारवर नियंत्रण ठेवायचे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये एकवाक्यता ठेवायची तर उद्धव हेच मुख्यमंत्री असावेत, असा आमदारांचा सूर आहे.
मुख्यमंत्री आणि रिमोट कंट्रोल
मुख्यमंत्रिपद हे पाच वर्षे शिवसेनेकडेच राहणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यातच मात्र, ज्या पद्धतीने काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष सरकार स्थापनेसाठी शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले आहेत ते बघता हे सरकार स्थिर राहील असे सध्याचे तरी चित्र आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्वत:कडे घेत सर्व चर्चांवर पडदा टाकला आहे.
‘तो’ नंतरचा विषय आहे, मी योग्य निर्णय घेईन
मुख्यमंत्रिपदी कोण असेल हे मी आताच सांगणार नाही. तो नंतरचा विषय आहे. मी योग्यवेळी योग्य निर्णय घेईन, एवढेच उद्धव यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितले होते. मात्र, सायंकाळी झालेल्या तिन्ही पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह शरद पवार यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांनी धरला. त्यानंतर उद्धव यांनी हे पद स्वीकारल्याचे समजते.