Maharashtra Government : देवेंद्र सरकारला 'सर्वोच्च' धक्का; उद्याच 'विश्वास' सिद्ध करण्याचे आदेश, हंगामी अध्यक्षच घेणार 'खुलं' मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 10:52 AM2019-11-26T10:52:24+5:302019-11-26T11:18:52+5:30
Maharashtra News : बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपाकडे केवळ ३० तासांचा अवधी
नवी दिल्ली: उद्याच बहुमत चाचणी घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी केवळ ३० तास उरले आहेत. बहुमत चाचणीवेळी गुप्त मतदान नको, तर खुलं मतदान घ्या. या निकालाचं थेट प्रक्षेपण करा, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.
विश्वासदर्शक ठराव जास्तीत जास्त लांबणीवर टाकण्याचा भाजपाचा प्रयत्न होता. तसे युक्तिवाददेखील त्यांच्या वकिलांकडून करण्यात आले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानं उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश देत भाजपाला मोठा धक्का दिला आहे. तर या निकालामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठा दिलासा मिळाला आहे.
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 pic.twitter.com/2RTzxAaknh
— ANI (@ANI) November 26, 2019
Supreme Court orders Floor Test in the Maharashtra assembly to be held on November 27 before 5 pm. The proceedings shall be live telecast. https://t.co/SLrGeF6et1
— ANI (@ANI) November 26, 2019
भाजपाला विधानसभेत तातडीनं बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देण्यात यावेत यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं याचिका दाखल केली होती. शनिवारी रात्री दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवर रविवारपासून सुनावणी सुरू झाली. आज यावर निकाल देताना न्यायालयानं उद्याच (बुधवारी) बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. उद्या संध्याकाळी ५ वाजता विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्या. बहुमत चाचणीचं थेट प्रक्षेपण करा, असे स्पष्ट आदेश न्यायालयानं दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांची नेमणूक करुन विश्वासदर्शक ठराव मांडून खुलं मतदान घ्या, असं न्यायालयानं निकालात म्हटलं आहे.
Maharashtra government formation: Supreme Court orders open secret ballot; Pro-tem Speaker should be appointed to conduct Floor Test which should be completed before 5 pm tomorrow (Nov 27).
— ANI (@ANI) November 26, 2019
शनिवारी सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याचवेळी अजित पवारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानं त्यांना बहुमत सिद्द करण्याचे आदेश तातडीनं देण्यात यावेत अशी मागणी याचिकेतून करण्यात आली होती. महाधिवक्ते तुषार मेहता आणि भाजपाचे वकील मुकूल रोहतगी यांनी बहुमत चाचणी शक्य तितकी पुढे ढकलली जाईल, अशा पद्धतीनं युक्तिवाद केला. तर शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल आणि राष्ट्रवादी-काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी तातडीनं विश्वासदर्शक मतदान करण्याची मागणी केली होती.