महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण; राज्यपालांनी 'ही' तारीख दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 07:48 PM2019-11-09T19:48:23+5:302019-11-09T20:40:50+5:30

सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपने सत्तास्थापनेचा दावा न करता गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला होता.

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has invited the single largest party BJP to form the government | महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण; राज्यपालांनी 'ही' तारीख दिली

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाला सत्तास्थापनेचे निमंत्रण; राज्यपालांनी 'ही' तारीख दिली

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण पाठविले आहे. राज्यपालांनी 11 नोव्हेंबरला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिले आहे.

राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्तास्थापनेच्या निमंत्रणाचे पत्र पाठविले आहे. 

सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपने सत्तास्थापनेचा दावा न करता गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. तेराव्या विधासभेची मुदत ९ नोव्हेबर रोजी संपत असल्याने तसे करणे गरजेचेच होते. मात्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पर्यायी व्यवस्था होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहण्यास त्यांना सांगितले आहे. राज्याला भाजपच्याच नेतृत्वाखाली नवे सरकार आम्ही देऊ, असा दावा फडणवीस यांनी राजीनाम्यानंतर केला होता. सध्यातरी कोणीच सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्यामुळे आता कोणकोणती सत्ता समीकरणे समोर येतात याबाबत उत्सुकता आहे. सध्या राज्यपालांनी मला काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करायला सांगितले आहे, पुढे राष्ट्रपती राजवट वा अन्य कोणताही निर्णय राज्यपाल घेतील, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

मात्र, राज्यपालांनी भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने पहिल्यांदा सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. याबाबतचे पत्र त्यांनी पाठविले आहे. हे पत्र मिळाल्यानंतर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होईल. यामध्ये निर्णय घेतला जाईल, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

सत्ता स्थापन करायची की नाही याबाबत उद्या निर्णय घेण्यात येणार आहे. अद्याप पत्र मिळालेल्याचे आपल्याला माहिती नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झालेली नाही. महायुतीला बहुमत आहे. आता शिवसेनेने ठरवायचे आहे, असेही मुनगंटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले. 

भाजपा- शिवसेनेत जुंपली

अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि अधिकारपदांच्या समसमान वाटपांच्या मुद्यांवरून भाजपा आणि शिवसेना यांच्यातील युतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याला उद्धव ठाकरे यांनी काही वेळातच प्रत्युत्तर दिले आहे. 

अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या आश्वासनाबाबतही फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ''अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाबाबत म्हणाल तर अशाप्रकारचा कुठलाही मुद्दा माझ्यासमोर चर्चिला गेला नव्हता. तसेच युतीची घोषणा करतानाही याबाबत कुठलाही निर्णय झाला नव्हता. कदाचित उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये असे आश्वासन दिले गेले असावे, असे आम्हाला वाटले. म्हणून अमित शाह यांच्याकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांनीही अशाप्रकारचे आश्वासन दिले नसल्याचे सांगितले.'' असे मुख्यमंत्री म्हणाले होते.  

'पहिल्यांदाच शिवसेना प्रमुख्यांच्या कुटुंबावर खोटारडेपणाचा आरोप झाला आहे. जनता पुरेपूर ओळखून आहे खरे कोण बोलतो आणि खोटे कोण? आमच्यात काय ठरले होते. मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा आले होते. फोनवर चर्चेवेळी त्यांनी सांगितले की, तुम्हाला लोकसभेला युतीच्या बदल्यात उपमुख्यमंत्रीपद मिळेल. मी त्यांना सांगितले की त्यासाठी मी लाचार नाही. मी माझ्या वडिलांना वचन दिले आहे. यावर त्यांनी म्हटले की ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री. तेव्हाही मी नाही म्हणालो. कारण मारामाऱ्या होतात, वाद होतात. यानंतर शहा मातोश्रीवर आले, माझ्या काळात हे नाते बिघडले माझ्याच काळात दुरुस्त करायचे आहे असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री वाटप मान्य केले होते.'' असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

 

Web Title: Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari has invited the single largest party BJP to form the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.