Maharashtra Politics: “आपले पंतप्रधान स्वत: योगी, त्यांच्या डोक्यात एखाद्या कम्प्युटरपेक्षा जलदगतीने विचार येतात”
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 11:11 IST2022-11-02T11:10:25+5:302022-11-02T11:11:19+5:30
Maharashtra Politics: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.

Maharashtra Politics: “आपले पंतप्रधान स्वत: योगी, त्यांच्या डोक्यात एखाद्या कम्प्युटरपेक्षा जलदगतीने विचार येतात”
Maharashtra Politics: गेल्या काही दिवसांत अनेकविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकारण तापलेले पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातून अनेक प्रकल्प बाहेरच्या राज्यांत जात आहेत. यातील बहुतांश प्रकल्प गुजरातला गेल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत असून, यावरून विद्यमान सत्ताधारी शिंदे-भाजप सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत आहे. यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यातच राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे तोंडभरून कौतुक केले आहे.
एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने उधळली. आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपण सर्वजण विश्वासावर चालतो. आपण जे काम करतोय ते किती कौशल्यपूर्ण करतोय, त्याला योगा म्हणतात. मला असं वाटतं आपले पंतप्रधान हे स्वत: योगी आहेत, ते योगाचा अभ्यास करतात. आपल्या पंतप्रधानांच्या डोक्यात एखाद्या संगणकापेक्षा थोडे जास्तच जलदगतीने विचार येतात, असे भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.
इतक्या वर्षांमध्ये कोणीच विचार केला नाही
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्याच्या वर्षभराच्या आतच कौशल्य विकास मंत्रालय सुरू केले. ही एक मोठी गोष्ट आहे. इतक्या वर्षांमध्ये कोणीच विचार केला नाही आणि त्यांनी हा विषय हाती घेतला. कारण, आपण सर्वजण विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांचे शिक्षण घेतो. परंतु आपण रोजगार कसा मिळवू शकतो, आपण कशाप्रकारे रोजगार देऊ शकतो. यासाठी पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केला की देशात अधिक प्रमाणात कौशल्य विकासाला चालना मिळेल, असे भगतसिंह कोश्यारी यांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यबाहेर जात असलेल्या प्रकल्पांवरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीश्वरांची झेप जात नाही. महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे राष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे. महाराष्ट्र आपल्या पायावर आणि हिमतीवर उभा आहे व राहील; पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर ‘सबका साथ, सबका विकास’ या मोदी घोषणेतील फोलपणा समोर येतो. रुपयातील ८० पैसे गुजरातला व २० पैशांत सारा देश हे गणित ठरले असेल तर गुजरातला सोन्यानेच का मढवीत नाही? असा सवाल शिवसेनेने केला आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"