मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज सरकारचा क्रूरपणा, विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवारांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 09:05 PM2023-09-01T21:05:13+5:302023-09-01T21:06:07+5:30
मराठा आरक्षण आंदोलन प्रकरणी सरकारची चौकशी नको तर कारवाई हवी- विजय वड्डेटीवार यांची मागणी
जालना जिल्ह्यातील सराटी अंतरवाली इथे मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होते. त्यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला, हा सरकारचा क्रूरपणा आहे.
आधी फडणवीस सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले.महायुती सरकार आल्यावरदेखील नुसत्या बैठका झाल्या, पण कारवाई झालीच नाही. मतांसाठी मराठा समाजाची फसवणूक या सरकारने केली, हे मराठा समाज विसरणार नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केली.
याआधी राज्यात मराठा समजाचे पाच - दहा लाखांचे मोर्चे निघाले, तेव्हा कायदा आणि सुव्यवस्थेची कोणतीही परिस्थिती उद्भवली नव्हती. आताच का मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज करण्यात आला? मराठा आरक्षण देऊ शकत नाही हे माहीत असल्यामुळेच महायुती सरकार हे आंदोलन चिरडत आहे, अशी टीकाही वड्डेटीवारांनी यावेळी केली.
ते पुढे म्हणाले की, दीड वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण नाकारल्यानंतर महायुती सरकारने काहीच केले नाही, त्यामुळे आज समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. पण त्याही आंदोलनात लाठीचार्ज करून सरकारने त्यांची मराठा आरक्षण प्रती आपली नियत दाखवली. लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा हक्क आहे, अस असताना आंदोलनकर्त्यांनावर बळाचा अती वापर झाल्याचे दिसत आहे. आंदोलनकर्त्यांना जखमी करणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे. या आंदोलनकर्त्यांनावर लाठीचार्ज करण्याचे आदेश कोणी दिले हे ही सरकारने स्पष्ट केले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांनी चौकशीची घोषणा केली, पण अश्या अनेक चौकश्या होतात. नवी मुंबई महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रकरणी पण चौकशीची घोषणा झाली पुढे झाले काहीच नाही. त्यामुळे जालना प्रकरणी देखील चौकशी नको कारवाई हवी. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी इंद्रा सहानी प्रकरणातील ५० टकके आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी लागेल. त्याशिवाय आरक्षण देता येणार नाही हे आता स्पष्ट आहे.केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असूनही याबाबत धोरणात्मक निर्णय होत नाही यातून सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होते असेही विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार म्हणाले.