महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 13:20 IST2024-12-16T13:18:07+5:302024-12-16T13:20:41+5:30
आमदार विजय शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.

महाराष्ट्राचा बिहार झाला, आता मंत्रिपद मिळालं तरी घेणार नाही; शिवतारेंच्या नाराजीचा स्फोट
Shiv Sena Vijay Shivtare ( Marathi News ) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये रविवारी नागपूर येथील राजभवनात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यंदा महायुतीतील तीनही पक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत काही जुन्या चेहऱ्यांचा पत्ता कट केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने आमदार शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
"महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे," असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी केला. तसंच पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की, "मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
"आता मंत्रिपद दिलं तरी घेणार नाही"
अडीच वर्षांनंतर मंत्रिमंडळात फेरबदल करून नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाईल, असं महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं आहे. त्यानुसार तुम्हाला अडीच वर्षांनी मंत्रिपदाचं आश्वासन देण्यात आलं आहे का, असा प्रश्न विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी म्हटलं की, "आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी मी ते घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही," असं म्हणत शिवतारे यांनी आपल्या आक्रमक भावना व्यक्त केल्या.
मंत्रिमंडळात एक पद रिक्त
रविवारी एकाचवेळी ३३ कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांना शपथ देण्यात आली. त्यामुळे फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळात ४२ मंत्री झाले असून एक मंत्रिपद रिक्त आहे. येथील राजभवनच्या हिरवळीवर आयोजित दिमाखदार समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. प्रत्येक मंत्र्यांच्या शपथविधीवेळी त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शपथ घेतलेल्या ३३ कॅबिनेट मंत्र्यांमध्ये भाजपचे १९ शिंदेसेनेचे ११ आणि अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांचा समावेश आहे. राज्यमंत्र्यांमध्ये भाजपचे तीन, शिंदेसेनेचे दोन आणि अजित पवार गटाच्या एकाचा समावेश आहे.