मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 04:37 PM2024-02-05T16:37:43+5:302024-02-05T16:38:04+5:30
दडपशाही करणे, जिवानिशी मारहाण करणे, पैशाची मागणी करणे असा, एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संत महात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षात घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडोफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र, अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली असल्याचा हल्लाबोल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे आणि यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून राज्याच्या आदर्श राजकीय परंपरेला काळीमा फासला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली.
मुंबई येथील प्रचितगड या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी ते म्हणाले की,भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखावर गोळीबार केला. यानंतर आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या काळात गुन्हेगारी वाढत आहे. भ्रष्टाचार बोकाळला असल्याची प्रतिक्रिया दिली. गायकवाडांच्या आरोपांना मुख्यमंत्र्याच्या पुत्राने पुष्टी दिली. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जावून मुख्यंत्र्यांच्या पुत्राची भेट घेतली. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे. याच मुख्यमंत्र्यांच्या काळात वर्षा निवासस्थानावर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीने गणपतीची आरती केली होती. वर्षा निवासस्थान हे गुंडांचे आश्रयस्थान झाले आहे का? हा खरा प्रश्न आहे.
या आगोदर शिंदे गटातील आमदार पुत्राने बिल्डरचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली होती. उपमुख्यंत्र्यांच्या पुत्राने गंभीर आरोप असलेल्या गजा मारणेची भेट घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलं गुंडांची पक्षात भरती करत आहेत. महाराष्ट्राला हे इजा-बिजा-तिजा उद्धवस्थ करायला निघाले आहेत. त्यामुळे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र, असा प्रश्न जनता विचारत आहे. या सरकारने पोलसेले गुंड कंत्राटदारांना धमकावत आहेत. याबाबत कंत्राटदार संघटनांनी इतिहासात पहिल्यांदा तक्रार केली आहे. शासनाची विकासकामे राजाश्रय असलेल्या गुंडांकडून बंद पाडली जात आहेत. दडपशाही करणे, जिवानिशी मारहाण करणे, पैशाची मागणी करणे असा, एक कलमी कार्यक्रम सध्या सुरू आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
या सरकारच्या काळात राजाश्रय मिळालेली अधिकारी मस्तावले आहेत. अजिंठा वेरूळ येथील कार्यक्रमात मा. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना या अधिकाऱ्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. ज्या राज्यात मा.न्यायमूर्तींना अपमानास्पद वागणूक दिली जात असेल तर सामान्य जनतेला हे मस्तवाल अधिकारी कशा प्रकारची वागणूक देत असतील याचा विचार न केलेला बरा. गुंडांना राजाश्रय देणाऱ्या, भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या, मुजोर अधिकाऱ्यांचे लाड पुरविणाऱ्या, सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा प्रश्न जनता या सरकारला विचारत आहे, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.