स्वाईन फ्लुचे सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात; देशात अव्वल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 06:00 AM2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:06+5:30
देशात २०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ११ हजार जणांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाला.
राजानंद मोरे -
पुणे : आरोग्यविषयक सुविधांबाबत देशात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रात स्वाईन फ्लुचे (एच १एन १) सर्वाधिक बळी गेल्याचे आकडेवारी समोर आली आहे. देशात २०१० ते २०१९ या दहा वर्षांच्या कालावधीत सुमारे ११ हजार जणांचा स्वाईन फ्लुमुळे मृत्यू झाला. त्यामध्ये सुमारे साडे तीन हजार जण महाराष्ट्रातील होते. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रा (एनसीडीसी)च्या या आकडेवारीमध्ये महाराष्ट्राच्या जवळपासही अन्य राज्य नाही.
नवी दिल्ली येथील ‘एनसीडीसी’च्या इंटिग्रेटेड डिसिज सर्व्हिलन्स प्रोग्रॅमअंतर्गत सेंट्रल सर्व्हिलन्स युनिटकडून सर्व राज्य व केंंद्रशासित प्रदेशांची स्वाईन फ्लुची आकडेवारी संकलित केली जाते. ‘एनसीडीसी’च्या संकेतस्थळावर २०१० पासूनची आकडेवारी देण्यात आली आहे. देशात आॅगस्ट २००९ मध्ये स्वाईन फ्लुचा पहिला रुग्ण पुण्यात दगावला होता. त्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणेला खडबडून जाग आली. सर्व राज्यांतील सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. रुग्णालयांबाहेर सर्दी, ताप, खोकला असलेल्या रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. पुण्यामध्ये पहिला मृत्यू झाल्याने विशेष दक्षता घेण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत स्वाईन फ्लुच्या विषाणुने महाराष्ट्राची पाठ सोडलेली नाही.
‘एनसीडीसी’च्या आकडेवारीनुसार, २०१० मध्ये देशात स्वाईन फ्लुमुळे १७६३ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये ६६९ रुग्ण एकट्या महाराष्ट्रातील होते. २०१५ हे वर्ष महाराष्ट्रासाठी सर्वाधिक बाधा देणारे वर्ष ठरले. यावर्षी ८ हजार ५८३ जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली होती. त्यापैकी ९०५ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर २०१७ मध्ये ७७८, २०१८ मध्ये ४६१ तर मागील वर्षी २४६ जणांचा मृत्यू झाला. मागील दहा वर्षांमध्ये सुमारे २९ हजार जणांना स्वाईन फ्लुची लागण झाली. हा आकडा इतर कोणत्याही राज्याच्या जवळपासही नाही.
--------------
दहा वर्षात ३४१७ जणांचा मृत्यू
मागील दहा वर्षात महाराष्ट्रापाठोपाठ सर्वाधिक मृत्यू गुजरातमध्ये सुमारे १९०० एवढे झाले आहेत. तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये १६०० जणांचा बळी गेला. त्यानंतर कर्नाटक (५२०), उत्तर प्रदेश (२८०), आंध्रप्रदेश (१८४), तामिळनाडू (१६६), दिल्ली (१६५) या राज्यांचा क्रमांक लागतो.
..............
* महाराष्ट्रातील २०१० पासूनची स्वाईन फ्लुची स्थिती -
वर्ष बाधित मृत्यू
२०१० ६,८१४ ६६९
२०११ २६ ५
२०१२ १,५५१ १३५
२०१३ ६४३ १४९
२०१४ ११५ ४३
२०१५ ८,५८३ ९०५
२०१६ ८२ २६
२०१७ ६,१४४ ७७८
२०१८ २,५९३ ४६१
२०१९ २,२८७ २४६
२०२० २२ ०० (दि. २ फेब्रु.पर्यंत)
------------------------------------
एकुण २८,८६० ३,४१७
------------------------------------
देशाची स्वाईन फ्लुची स्थिती (२०१०-१९)
वर्ष स्वाईन फ्लुची लागण मृत्यू
२०१० २०,६०४ १,७६३
२०११ ६०३ ७५
२०१२ ५,०४४ ४०५
२०१३ ५,२५३ ६९९
२०१४ ९३७ २१८
२०१५ ४२,५९२ २,९९१
२०१६ १७,८६ २६३
२०१७ ३८,८११ २,२७०
२०१८ १५,२६६ १,१२८
२०१९ २८,७९८ १,२१८
----------
(स्त्रोत : एनसीडीसी, नवी दिल्ली)