महाराष्ट्रात मागील तीन वर्षांत तब्बल ५५ वाघ आणि २६३ बिबट्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 04:38 AM2019-02-07T04:38:44+5:302019-02-07T04:38:58+5:30
मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे.
- दयानंद पाईकराव
नागपूर - मानव-वन्यजीव संघर्ष अलीकडच्या काळात वाढला असून, यात वन्यजीवच नव्हे, तर माणसांनाही नुकसान सहन करावे लागत आहे. या संघर्षात माणसे बळी पडत असताना प्राण्यांचाही जीव धोक्यात आला आहे. मागील तीन वर्षांत राज्यात वनप्राण्यांच्या हल्ल्यात १४४ व्यक्तींना जीव गमवावा लागला आहे, तर ५५ वाघ, २६३ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
देशात सर्वाधिक वाघमहाराष्ट्रात आहेत. शिकाऱ्यांचा धुमाकूळ आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष यामध्ये वाघांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. या राष्ट्रीय प्राण्याला वाचविण्यासाठी व्यापक उपाययोजना, तसेच अभियान राबविण्यात आले. वन विभागाने अनेक प्रकारच्या उपाययोजना राबविल्या. सामाजिक संस्था, वन्यजीवप्रेमींनी व्यापर जनजागृती अभियान राबवित वाघांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला.
याचे सकारात्मक परिणामही गेल्या काही काळात दिसून आले. असे असले, तरी वाढत्या शहरीकरणामुळे जंगल क्षेत्र सातत्याने कमी होत आहे. यामुळे प्राण्यांच्या अधिवासाचे क्षेत्र कमी होत चालले आहे. पर्यायाने जंगलातील हे प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. शिवाय पाण्याचा अभाव आणि अन्नाच्या शोधात त्यांचा कल गावांकडे वळला आहे. पूर्वी त्यांच्या भ्रमण मार्गात नागरी वस्ती नसायची. आज मात्र ती परिस्थिती दिसत नाही. साहजिकच यातून मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण होऊन वन्यजीव आणि मानवाच्या जीवितावर बेतण्याचे प्रसंग वाढले आहेत. अशा असमतोल परिस्थितीमुळे वाघ वाचविण्याचे कितीही प्रयत्न केले, तरी त्यांचा बळी जात आहे. मागील तीन वर्षांत त्यामुळेच ५५ वाघांचा मृत्यू झाला आहे. हा शासकीय आकडाही धक्कादायक आहे. वाघाशिवाय इतर प्राण्यांचाही हा संघर्ष बेतत आहे.
तीन वर्षांत २६३ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय काळवीट, चौसिंग, रानगवे, मोर, अस्वल आदी प्राण्यांनाही जीव गमवावा लागत आहे. प्राणीच नव्हे, तर माणसांनाही जीव गमवावा लागला असून, १४४ नागरिक प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. याशिवाय तीन वर्षांत शेतात शिरलेल्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे.
याशिवाय तीन वर्षांत शेतात शिरलेल्या प्राण्यांच्या हल्ल्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. मागील तीन वर्षांत २०१६ मध्ये १४ वाघ, २०१७ मध्ये २२ वाघ आणि २०१८ मध्ये १९ वाघांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये ८९ बिबट, २०१७ मध्ये ८६ बिबट आणि २०१८ मध्ये ८८ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. २०१६ मध्ये ५७ व्यक्ती, २०१७ मध्ये ५४ व्यक्ती आणि २०१८ मध्ये ३३ व्यक्तींना आपला जीव गमावावा लागल्याची धक्कादायक माहिती आहे.
वन कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे, तसेच शीघ्र बचाव पथकाची निर्मिती ठिकठिकाणी करण्यात आली आहे. वन विभागातील साधनसामुग्री अत्याधुनिक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. -नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य