राष्ट्रीय शालेय कला उत्सवात महाराष्ट्राला दोन पुरस्कार
By admin | Published: December 13, 2015 01:59 AM2015-12-13T01:59:26+5:302015-12-13T01:59:26+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित लोककलांची राष्ट्रीय स्पर्धा ‘कला उत्सव २0१५’मध्ये महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तमाशा’ व ‘लोकसंगीत पोवाडा’ला
नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे आयोजित लोककलांची राष्ट्रीय स्पर्धा ‘कला उत्सव २0१५’मध्ये महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘तमाशा’ व ‘लोकसंगीत पोवाडा’ला वेगवेगळ्या गटात तिसऱ्या क्रमांकाचे दोन पुरस्कार प्राप्त झाले.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह व रामशंकर कथेरियांच्या हस्ते हे पुरस्कार सिरी फोर्ट सभागृहात प्रदान करण्यात आले. दिल्लीच्या बालभवनात तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशाच्या विविध राज्यांतील १४00 विद्यार्थी सहभागी झाले होते.
राष्ट्रीय कला उत्सवाचा मुख्य हेतू ग्रामीण भारतातल्या विविध समुदायांच्या लोककला, तसेच आदिम संस्कृतीतल्या कलागुणांच्या योगदानाची देशाला ओळख व्हावी; समाजात त्यांच्याविषयी सन्मान व सद्भावना जागृत व्हावी असा आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या तमाशाला तृतीय, तसेच लोकसंगीत वर्गात पोवाड्यालाही तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या पथकात राज्यातल्या १६ विद्यार्थिनी व २५ विद्यार्थी होते. महाराष्ट्राच्या विद्यार्थी विकास विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे समन्वयक व प्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, कार्यक्रम अधिकारी सलील वाघमारे यांनी पथकाच्या वतीने पुरस्कार स्वीकारले.
पुरस्कार सोहळ्यात नोबेल पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी, विख्यात लेखक रस्किन बाँड, विख्यात नृत्यांगना सोनल मानसिंग आदी मान्यवर विशेष अतिथी या नात्याने उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)