"हा हंगामी आजार, सावध राहा"; HPMV व्हायरसमुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 10:35 IST2025-01-06T10:08:06+5:302025-01-06T10:35:46+5:30
चीनमधील ह्युमन मेटापन्यूमोव्हायरच्या प्रकरणांच्या वाढीमुळे राज्याच्या आरोग्य विभागाने सावधगिरीचा सल्ला दिला आहे.

"हा हंगामी आजार, सावध राहा"; HPMV व्हायरसमुळे राज्याच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना
Maharashtra HMPV: चीनमधल्या ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीमुळे जगभरात पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होणे आणि फ्लूसारखी लक्षणे दिसून येतात. चीनमध्ये एचएमपी विषाणूचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे आणि मुख्यतः लहान मुले आणि वृद्ध लोकांना याचा फटका बसत आहे. चीनमध्ये आरोग्य संकटाची गंभीर चिंता निर्माण झाल्याने शेजारील देशांना काळजी घ्यावी लागत आहे. चीनमधल्या या नव्या संकटामुळे भारत सतर्क झाला असून राज्याच्या आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जगभरातल्या कोरोनाच्या संकटानंतर पाच वर्षांनी चीनमध्ये नवीन आरोग्याची समस्या उभी राहिली आहे. चीनमध्ये एचएमपीव्ही या विषाणूचा संसर्गाने गंभीर रुप धारण केलं आहे. त्यामुळे आता भारतातही आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहेत. चीनमध्ये एचएमपीव्ही प्रकरणांमध्ये झाल्यानंतर, आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी रविवारी राज्यभरातील उपसंचालक, सिव्हिल सर्जन आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना श्वसन संसर्गाच्या आणि इन्फ्लूएंझा सारख्या आजारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश जारी केले.
चीनमधील एचएमपीव्ही संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. घाबरु नका पण सतर्क राहा अशा सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. तसेच सर्दी खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे निर्देशही डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिले आहेत. यासोबत स्वच्छतेची नियमावली पाळण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही तरी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आलं आहे.
चीनमध्ये नोंदवलेल्या एचएमपीव्ही प्रकरणांबाबत घाबरण्याची गरज नाही. आवश्यक ती खबरदारी राबविण्यात येत असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आत्तापर्यंत, महाराष्ट्रात एचएमपीव्हीचे एकही प्रकरण नोंदवले गेले नाही, असे आवाहन आरोग्य विभागाने लोकांना दिलं आहे. "चीनमध्ये एचएमपीव्हीचा उद्रेक झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. हा विषाणू तीव्र श्वसन संक्रमणाचे एक महत्त्वाचे कारण आहे आणि २००१ मध्ये नेदरलँड्समध्ये पहिल्यांदा याची नोंद करण्यात आली होती. हा एक सामान्य श्वासोच्छवासाचा विषाणू आहे जो प्रामुख्याने श्वसनमार्गाच्या संसर्गास कारणीभूत ठरतो," असे अधिकाऱ्यांनी म्हटलं.
तसेच हा एक हंगामी आजार आहे, जो सामान्यत: हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात होतो, जो रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस आणि फ्लू सारखा असतो, असं राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी निवेदन जारी करुन म्हटलं आहे.
नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी?
खोकला किंवा शिंका येत असल्यास रूमालाचा वापर करा
साबणाने वेळोवेळी हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक अन्न खा
घर कार्यालयांमध्ये व्हेटिंलेशनची काळजी घ्या
टिशू पेपर आणि रुमालाचा फेरवापर टाळा
आजारी लोकांशी जवळचा संपर्क टाळा
डोळे, नाक, तोंडाला वारंवार स्पर्श करणे टाळा
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळा
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेणे टाळा