Maharashtra Mini Lockdown: राज्यात दारूची दुकानं पण बंद होणार का? आरोग्य मंत्र्यांनी तळीरामांना झापलं, काय म्हणाले वाचा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 08:12 PM2022-01-09T20:12:24+5:302022-01-09T20:12:59+5:30
Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे.
Maharashtra Mini Lockdown: राज्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राज्य सरकारनं निर्बंधांची नवी नियमावाली (Maharashtra corona guidelines) जाहीर केली आहे. यानुसार राज्यात आज मध्यरात्रीपासून नव्या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यात १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसंच अनेक निर्बंध लागू करण्यात आलेले आहे. पण नव्या नियमावलीमध्ये मंदिरं, धार्मिक स्थळांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसंच मद्यविक्रीबाबतही कोणत्याही सूचना किंवा निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत.
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीवर टीका करताना आमदार सदाभाऊ खोत यांनी आज राज्यात 'ग्लास' सुरू आणि 'क्लास' बंद, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं म्हणत सरकारकडून मद्यविक्रीवर कोणतेही निर्बंध लागू न करण्यात आल्याबद्दल टीका केली आहे. राज्यात दारूवरील टॅक्स कमी केला जातो आणि शाळा बंद केल्या जातात असा अजब कारभार सुरू असल्याचं खोत म्हणाले. राज्य सरकारवर नव्या नियमावरून जोरदार टीका होत असताना आता राज्याचे आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांचंही विधान समोर आलं आहे.
राज्यात नागरिकांनी गर्दी करणं जर असंच सुरू ठेवलं तर मंदिरं, धार्मिक स्थळं आणि मद्यविक्रीची दुकानं देखील बंद केली जातील असा इशाराच दिला आहे. "राज्यात जोवर ऑक्सिजनची मागणी ७०० मेट्रीक टनांवर पोहोचत नाही आणि रुग्णालयातील उपलब्ध बेड्सपैकी ४० टक्के बेड्स भरले जात नाहीत तोवर नवे निर्बंध लागू करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नाही. पण लोकांनी जर रस्त्यावर निष्काळजीपणे वागून गर्दी करणं सुरूच ठेवलं तर मद्यविक्रीसह इतर दुकानांवरही कडक निर्बंध लावावे लागतील", असं स्पष्ट केलं आहे.
कोरोना वाढला तर मंदिरं देखील होणार बंद
"गर्दी वाढली आणि नियमांचं पालन होताना दिसलं नाही तर मद्यविक्रीचीही दुकानं बंद केली जातील. यासोबत धार्मिक स्थळं देखील बंद करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल", असं राजेश टोपे म्हणाले. राज्यात सध्या ऑक्सिजनची मागणी साडेचारशे मेट्रिक टनच्या जवळ पोहोचली आहे. त्यामुळे सध्यातरी निर्बंध आणखी कठोर करण्याची गरज नसल्याचंही टोपे म्हणाले. परिस्थितीत बदल होईल तसे निर्णय घेण्यात येतील. कारण कोरोना रुग्णसंख्या वाढली तर महामारीला नियंत्रित करणं खूप कठीण होऊन बसेल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.