गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मोठा निर्णय; 'थर्टी फर्स्ट'च्या मध्यरात्री करणार 'हे' काम!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 02:45 PM2020-12-31T14:45:53+5:302020-12-31T14:49:48+5:30
संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना माझे सहकारी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील...
पुणे / मुंबई : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्ष स्वागताची प्रत्येक जण जल्लोषात तयारी करत आहे. पण यंदा कोरोनाचे सावट असल्याने काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. मात्र तरीदेखील नागरिकांचा 'उत्साह' कायम असणार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ते देखील ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री महत्वाची जबाबदारी पार पाडणार आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील जल्लोषात सहभागी न होता आपल्या पोलीस दलाचा उत्साह वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ते स्वतः पुण्याच्या नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहेत. एवढेच नव्हे तर 'कंट्रोल रूम'ला येणारा नव्या वर्षातला पहिला म्हणजेच 31 डिसेंबरच्या रात्री बरोबर बारा वाजता येणारा पहिला 'कॉल' स्वतः देशमुख घेणार आहेत.
देशमुख म्हणाले, मी स्वतःला महाराष्ट्र पोलीस दलाचा कुटुंबप्रमुख मानतो. माझे सहकारी कोरोना काळात अथक काम करत असताना त्यांना भेटण्यासाठी मी 32 जिल्ह्यांचा प्रवास केला. उद्देश एवढाच होता की मी त्यांच्यासोबत आहे याची जाणीव त्यांना व्हावी. सणवार, उत्सव या सगळ्यात पोलीस दल रस्त्यावर असतो. आताही तसेच होणार. संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागतात चिंब होत असताना माझे सहकारी त्यांच्या आणि महाराष्ट्राच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावत असतील.
३१ च्या मध्यरात्री मी त्यांच्यासोबत राहणार आहे.त्यातही पोलीस नियंत्रण कक्षातील माझ्या कर्मचाऱ्यांना सतत 'अलर्ट' राहावे लागते. मात्र, तुलनेने त्यांना अधिकार आणि मान मिळत नाही. त्यामुळे हा विभाग काहीसा दुर्लक्षित आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री पोलीस नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा मी तिथे जाऊन देणार आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्याशी गप्पा मारणार आहे. 'कंट्रोल रूम'ला रात्री बारा वाजता येणारा पहिला 'कॉल' देखील मीच घेणार आहे असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
............
सरत्या वर्षावर कोरोनाचे मळभ होते. आगामी वर्ष आशादायी असणार आहे. यासाठी 'होप २०२१' असे लिहिलेला केक पोलीस सहकाऱ्यांसोबत कापून तआनंदाचे चार क्षण निर्माण करण्याचा माझा प्रयत्न असेल. राज्यातील प्रत्येक शहरातल्या पोलीस आयुक्तांनी हा उपक्रम राबवावा असेही मी सुचवले आहे
- अनिल देशमुख,गृहमंत्री.