"महाराष्ट्रात महाआघाडी नव्हे; महाअनाडी आघाडी"!, योगी आदित्यनाथ यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 09:21 AM2024-11-07T09:21:02+5:302024-11-07T09:21:33+5:30
Maharashtra Assembly Election 2024: देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून काँग्रेसने सत्ता उपभोगत असताना केवळ स्वहित जोपासण्यात धन्यता मानली. धर्म आणि देश, राष्ट्रीय एकात्मता, समाज, मूल्य आणि आदर्शांची चिंता न करता केवळ देशाला तोडण्याचे काम केले.
वाशिम - देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हापासून काँग्रेसने सत्ता उपभोगत असताना केवळ स्वहित जोपासण्यात धन्यता मानली. धर्म आणि देश, राष्ट्रीय एकात्मता, समाज, मूल्य आणि आदर्शांची चिंता न करता केवळ देशाला तोडण्याचे काम केले. त्याच काँग्रेसचा समावेश असलेली महाविकास आघाडी नव्हे; तर महाअनाडी आघाडी आहे, असा घणाघात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी वाशिम येथील जाहीर सभेत केला.
वाशिम जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ योगी आदित्यनाथ यांची सभा झाली. काँग्रेसच्या काळात पाकिस्तानातील अतिरेक्यांनी देशात घुसून अराजकता माजविली होती. चीनकडूनही घुसखोरी केली जायची. संबंध खराब होण्याची चिंता असलेल्या काँग्रेसने त्यावर कायम माैन बाळगले, अशी टीका त्यांनी केली.
‘बटेंगे तो कटेंगे’
तिवसा (जि. अमरावती) : जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांपासून सावध राहावे, तसेच समस्त हिंदू बांधवांनी विस्कळीत न होता एकसंघ राहायला हवे.
अन्यथा हिंदूंची दैना झाल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन योगी आदित्यनाथ यांनी केले. शिवाय ‘बटेंगे तो कटेंगे’ असे म्हणण्यासही ते विसरले नाहीत.
महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुकुंज मोझरी येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.