"महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन, गेल्या दीड वर्षांत...", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 11:19 AM2024-01-26T11:19:07+5:302024-01-26T11:33:06+5:30
महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असा आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुंबई : देशात आणि राज्यात आज 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानावर ध्वजावंदन केले. त्याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 9 वर्षातील कामाचे कौतुक केले. त्याशिवाय राम मंदिरावरही भाष्य केले. तसेच देशाच्या प्रगतिमध्ये महाराष्ट्राचं योगदान महत्वांचे असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व क्रांतिकारकांना यांना विनम्र अभिवादन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, महाराष्ट्र हे या देशाचं ग्रोथ इंजिन आहे. हे स्थान टिकवण्यासाठी मागील दीड वर्षांच्या काळात महायुती सरकारने आपलं कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं, हे मी अभिमानाने या ठिकाणी सांगू इच्छितो. सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, सांस्कृतिक क्रीडा या सर्वच आघाड्यांवर महाराष्ट्राने आपली छाप टाकण्यास सुरुवात केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यातील जनतेला भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!#प्रजासत्ताकदिन#RepublicDay2024pic.twitter.com/Iz36q4N3AV
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 26, 2024
महाराष्ट्रात एक छोटा भारत वसलेला आहे असा आपण म्हणतो आणि त्यामुळेच भारताच्या प्रगतीची पताका डौलाने फडकत ठेवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच, भारत हा संपूर्ण विश्वात स्वतःचे स्थान निर्माण करण्यात यशस्वी होत आहे. याचे निर्वाद श्रेय देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना द्यायलाच पाहिजे. गेल्या नऊ वर्षात देशाने आपली मोहर जगावर उमटवली आहे. महाराष्ट्र देखील देशाच्या प्रगतीत आपले बहुमूल्य योगदान दिल्याशिवाय राहणार नाही. हे मी ठामपणे सांगू इच्छितो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
महाराष्ट्रात विकासाचा एक नवं पर्व आले. कृषी, शिक्षण, आरोग्य, उद्योग, पायाभूत सुविधा यामध्ये आपण मोठी झेप घेत आहोत. आपल्या समृद्ध साधन सामग्री आणि पर्यावरणाला सुद्धा आपल्याला जपायचे आहे. महाराष्ट्राची ओळख एक शांतताप्रिय, सामाजिक सलोखा असणार राज्य म्हणून आहे. आपल्यालाही ओळख वाढवायची आहे. महाराष्ट्राला देशात क्रमांक एक राज्य बनवण्याची शपथ घेऊयात, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.