'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 05:39 PM2020-09-04T17:39:40+5:302020-09-04T17:42:41+5:30
शुक्रवारी महाराष्ट्र करणी सेनेचे अजयसिंह सेंगर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे कंगना राणौतला हे वक्तव्य आता चांगलंच भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. या वादात शिवसेना, मनसे पाठोपाठ आता महाराष्ट्र करणी सेनाही उतरली आहे. कंगना राणौतने मुंबईची माफी नाही मागितली तर आम्ही कंगना राणौतच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू, असा इशारा महाराष्ट्र करणी सेनेचे अजयसिंह सेंगर यांनी दिला आहे.
शुक्रवारी महाराष्ट्र करणी सेनेचे अजयसिंह सेंगर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी कंगना राणौतच्या वक्त्तव्यावर संताप व्यक्त केला. कंगना राणौत सारख्या प्रवृत्तीनेच आतंकवाद पोसला आहे. कंगना राणौतने मुंबईबाबत केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्यामुळे तिने तात्काळ मुंबई आणि मुंबईकरांची माफी मागावी, असे अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, कंगना राणौतने मुंबईची माफी नाही मागितली तर तिला राज्यात कुठेही शुटींग करू देणार नाही. करणी सेनेने पद्मावतीचा सेट जसा जाळून टाकला, त्याचप्रमाणे कंगना राणौतच्या सिनेमाचे सेट जाळून टाकला जाईल, असा इशारा अजयसिंह सेंगर यांनी दिला आहे. याशिवाय, महाराष्ट्र ही कंगना राणौतची कर्मभूमी आहे. तिच्याबद्दल कृतज्ञ असायला हवं. पण त्याऐवजी मुंबईची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी केली जाते. त्याबाबत कंगना राणौतला लाज वाटली पाहिजे, असेही अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशारा
कंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला आहे.
पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर पुन्हा हल्लाबोल
मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान
"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.
कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
आणखी बातम्या...
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल
- भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग', काँग्रेस नेत्याचा टोला
- राज्यात बदल्यांचा धंदा सुरू झालाय, फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल