खामगावात उजळले ‘बाला’चे भाग्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 12:07 AM2018-12-24T00:07:04+5:302018-12-24T00:07:08+5:30
गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
- योगेश फरपट
खामगाव - गुण असूनही अनेकदा संधी न मिळाल्याने खेळू शकलो नाही. मात्र, बुलडाणा जिल्हयातर्फे मिळालेल्या संधीमुळे आपण महाराष्ट्र केसरीचा बहुमान मिळवू अशी भावनिक प्रतिक्रिया बाला रफिक शेख यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
जालना येथे रविवारी पार पडलेल्या कुस्ती स्पर्धांमध्ये विजय संपादीत करीत बालाने महाराष्ट्र केसरी हा बहुमान पटकावला. यावेळी त्याने बुलडाणा जिल्हा कुस्तीगिर परिषद संघाचे अध्यक्ष गोकूलसेठ सानंदा यांचे विशेष आभार मानले. बाला रफिक शेख हा गेल्यावर्षी खामगाव येथे आला होता. यावेळी त्याने गोकूलसेठ सानंदा यांची भेट घेतली होती.
यावेळी बाला रफीक शेख याने आपली सर्व परिस्थिती सांगून बुलढाणा जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी खेळू देण्याची विनंती बाला रफिक शेखने केली होती. या विनंतीला सहमती दर्शवत यावर्षीच्या खेळासाठी त्याला बुलडाणा जिल्हा कुस्तिगीर संघाने संधी दिली. त्यामुळेच तो महाराष्ट्र केसरी ठरू शकला. तत्पूर्वी खामगाव येथे पार पडलेल्या चाचणीस्पर्धेत केसरी गटासाठी गोकूलसेठ यांनी त्याची निवड केली होती. त्यात त्याने बाजी मारली होती. त्यानंतर मातीवरच्या या मल्लाने रविवारी जालना येथे झालेल्या महाराष्ट्र केसरीत अंतीम लढतीत पुण्याच्या अभिजीत कटके वर ११:३ ने धुळ चारीत महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकाविला.
संधी दिल्याबद्दल बालाने सानंदा परिवाराचे व बुलडाणा जिल्हयातील तमाम कुस्तीप्रेमी जनतेचे आभार मानले आहे. बाला रफिक शेख च्या बहुमानाने मातृतिर्थ बुलडाणा जिल्हयाचे नाव कुस्तीच्या ईतिहासात सुवर्ण अक्षरांनी नोंदवल्या गेले आहे. त्याच्या विजयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
युवराजला कास्यपदक
कुस्तीच्या स्पर्धेत बुलडाणा जिल्हयातील शेगाव येथील युवराज भोसले याने कास्य पदक प्राप्त केले आहे. या दोघांच्याही विजयाने जिल्हयाचे नाव उज्वल केले आहे.
विदर्भाला पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीचा किताब बहुमान मिळाला. खेळाडू कोणत्या समाजाचा आहे. हे महत्वाचे नाही. तो खेळ कसा खेळतो हे आमच्यासाठी महत्वाचे आहे. बालाच्या विजयाने जिल्ह्याचे नाव उज्वल झाले आहे. हिंद केसरीसाठी सुद्धा त्याला सर्वतोपरी मदत करू. - गोकूलसेठ सानंदा, अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा कुस्तीगिर परिषद संघ, बुलडाणा