Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चे बिगुल वाजणार, पैलवान खाशाबा जाधव यांच्या साताऱ्यात रंगणार स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 11:40 AM2022-03-11T11:40:26+5:302022-03-11T11:40:41+5:30
Maharashtra Kesari : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यंदा स्पर्धेचे यजमानपद साताऱ्याला दिले असून, 4 ते 9 एप्रिलदरम्यान स्पर्धा होईल.
सातारा: मागील दोन वर्षांपासून कुस्तीप्रेमी ज्याची वाट पाहत होते, त्या महाराष्ट्र केसरी (maharashtra kesari) कुस्ती स्पर्धेला मुहूर्त मिळाला आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेने नुकतीच स्पर्धेचे ठिकाण आणि तारीख जाहीर केली आहे. येत्या 4 एप्रिलपासून ही स्पर्धा सातारा (satara) शहरातील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकूलात रंगणार आहे.
महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने यंदाचे यजमानपद ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांच्या साताऱ्याला दिले आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यकारिणीने पुण्यात झालेल्या बैठकीत 4 ते 9 एप्रिलदरम्यान साताऱ्यातील छत्रपती शाहू क्रीडा संकूलात या स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते. पण, आता कोरोना निर्बंध सूट मिळाल्यामुळे परिषदेने स्पर्धेच्या आयोजनाचा निर्णय घेतला आहे. आता या स्पर्धेची घोषणा झाल्यामुळे राज्यातील पैलवानांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अनेक दिवसांपासून सुरू होती मागणी
यापूर्वीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2020 मध्ये पार पडली होती. त्या स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेवर मात करत मानाची चांदीची गदा मिळवली होती. त्यानंतर कोरोनामुळे दोन वर्षांपासून स्पर्धा भरवण्यात आली नाही. पण, कोरोनची लाट कमी झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवावी, अशी मागणी राज्यातील अनेक पैलवान आणि कुस्तीप्रेमींकडून करण्यात येत होती. त्यानुसार, आता कुस्तीगीर परिषदेने या स्पर्धेचे आयोजन केले आहे.