महाराष्ट्र केसरी स्पर्धा: मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’! विजयापेक्षा पराभवाचीच चर्चा अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 07:31 AM2023-01-17T07:31:50+5:302023-01-17T07:32:17+5:30
मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली.
उमेश गो. जाधव
पुणे : नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाडला अस्मान दाखवत मानाची गदा उंचावली. मात्र, या स्पर्धेनंतर खरी चर्चा रंगली ती सिकंदर शेखच्या पराभवाचीच. तो हरला की हरवला गेला, असा संशयाचा सूर सोशल मीडियावर आहे. यावरून मैदान गमावूनही तो ठरला ‘सिकंदर’ असेच चित्र दिसत आहे.
सिकंदरने नुकताच एक व्हिडीओ करून सांगितले की, “मी हरलो की हरवला गेलो याबाबत चर्चा करणे थांबवा. यंदा नाही तर पुढील वर्षी मी महाराष्ट्र केसरीची गदा नक्की खांद्यावर घेणार. तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या.” यंदा सिंकदरने पहिल्या फेरीपासून आक्रमक आणि सरस कामगिरी केली. महेंद्र गायकवाड विरुद्ध किताबाच्या उपांत्य लढतीत पहिल्याच फेरीत सिकंदरने ४-१ अशी आघाडी घेतली होती. मात्र, सिकंदरला आतली टांग लावून बाहेर पाडणाऱ्या महेंद्रला चार गुण दिल्याने सिकंदरचा पराभव झाला.
खरंच सिकंदरच्या प्रतिस्पर्ध्याला चार गुण देण्याची गरज होती का? ते गुण घाईने जाहीर करण्याचा प्रयत्न का केला? असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित होत आहेत. सिकंदर मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातला. घरात अठराविश्व दारिद्र्य आणि हमालाचा पोरगा ते कुस्तीपटू असा प्रवास रोमहर्षक आहे.
पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून पोलिसांत तक्रार
महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरूड पोलिसांकडे तक्रार अर्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा कोथरूड येथे शनिवारी झाली. या स्पर्धेतील अंतिम फेरीमधील सिकंदर शेख विरुद्ध महेंद्र गायकवाड या कुस्तीमध्ये मारुती सातव यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले. या कुस्तीतील एका डावामध्ये महेंद्र गायकवाड याला ४ गुण दिले. त्यावर मोठा वाद झाला. त्यानंतर रविवारी दुपारी मारुती सातव यांना संग्राम कांबळे या नावाने एकाचा फोन आला. त्याने मारुती यांना धमकी दिली. हे संभाषण सोशल मीडियावर प्रसारित करून स्वत:च्या रिव्हाॅल्व्हरमध्ये गोळ्या भरत असल्याचा व्हिडीओ प्रसारित केला. सातव यांचा जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले.
सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत असता तर ती कुस्ती अतिशय रंगतदार झाली असती. उपांत्य लढतीत गुण गमावल्यावरही त्याने पंचांशी हुज्जत घातली नाही. भविष्यात तो नक्कीच गदा उंचावेल. - अमोल बुचडे, रुस्तुम ए हिंद
सिकंदरवर कोणताही अन्याय झालेला नाही. कुस्तीतील नियमांच्या अज्ञानामुळे असे आरोप होत आहेत. सिकंदर धोकादायक स्थितीत पडल्यामुळेच महेंद्रला चार गुण देण्यात आले. अशावेळी दोन नाही तर चार गुण दिले जातात. - पंच समिती, महाराष्ट्र केसरी