शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर- मनमोहन सिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 03:19 PM2019-10-17T15:19:29+5:302019-10-17T15:20:33+5:30

मनमोहन सिंग यांची मोदी सरकारवर टीका

Maharashtra is leader in farmer suicides today says former PM Manmohan Singh | शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर- मनमोहन सिंग

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर- मनमोहन सिंग

googlenewsNext

आर्थिक मंदीचा महाराष्ट्राला सर्वाधिक फटका- मनमोहन सिंग

मुंबई: सरकारच्या उदासीनतेचा फटका सर्वसामान्यांना बसत असून शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर असल्याचं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले. सरकारच्या धोरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक मंदीचा सर्वाधिक महाराष्ट्राला बसल्याचंही त्यांनी म्हटलं. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

'सध्या शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. आर्थिक मंदी, सरकारच्या उदासीनतेचा परिणाम देशाच्या भविष्यावर होत आहे. आर्थिक मंदीचे परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात दिसू लागले आहेत. गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वाधिक कारखाने बंद पडले आहेत,' असं माजी पंतप्रधानांनी म्हटलं. सर्वसामान्यांसाठी योजना आखण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएमसी बँक प्रकरणात लक्ष घालून 16 लाख खातेदारांना दिलासा द्यावा, असं आवाहन सिंग यांनी केलं. 'पीएमसी बँकेच्या खातेदारांसोबत घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून 16 लाख खातेदारांना सहन कराव्या लागत असलेल्या अडचणी दूर कराव्यात,' असं सिंग म्हणाले. केंद्र आणि राज्य सरकारसह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या प्रकरणात लक्ष घालून ग्राहकांना न्याय द्यावा, असं आवाहनदेखील त्यांनी केलं. 

सरकारच्या आर्थिक धोरणांचा मोठा फटका महाराष्ट्रातील उद्योगांना बसला आहे. सतत चार वर्षांपासून राज्यातील उत्पादन घटत आहे. भाजपाकडून प्रशासनाच्या डबल इंजिन मॉडेलची जाहिरातबाजी सुरू आहे. मात्र हे मॉडेल पूर्णपणे फसलं आहे. महाराष्ट्रातील उद्योगांच्या उत्पादनात सतत होणारी घट हेच अधोरेखित करते, अशा शब्दांत माजी पंतप्रधानांनी सरकारच्या विकासाच्या दाव्यांचा समाचार घेतला.

Web Title: Maharashtra is leader in farmer suicides today says former PM Manmohan Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.