देशात महाराष्ट्रच अग्रेसर; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
By admin | Published: May 1, 2016 01:57 AM2016-05-01T01:57:14+5:302016-05-01T01:57:14+5:30
महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आजही क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राचे मॉडेल अधिक प्रभावी असून केंद्र सरकारनेही आता याच मॉडेलचा स्वीकार केला आहे. त्यामुळे यापुढेही महाराष्ट्रच नंबर
मुंबई : महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत आजही क्रमांक एकवर आहे. महाराष्ट्राचे मॉडेल अधिक प्रभावी असून केंद्र सरकारनेही आता याच मॉडेलचा स्वीकार केला आहे. त्यामुळे यापुढेही महाराष्ट्रच नंबर एक राहणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस दिली.
विविध क्षेत्रांत मूलगामी परिवर्तन घडविण्यासह सर्व समाजघटकांच्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी सरकार जाणिवेने प्रयत्नशील आहे. यंदा राज्यापुढे दुष्काळ आणि पाणीटंचाईचे आव्हान असले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सरकार सर्वशक्तीनिशी प्रयत्न करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
जलसंधारणातून पाणलोट क्षेत्राचा विकास करून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करण्यावर सरकारचा भर आहे. आतापर्यंत केवळ पैसे खर्च केले, मात्र पाणलोटाचा विकास झाला नाही. शिवाय, धरणांमुळे दुष्काळमुक्ती शक्य नाही. त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. वैद्यकीय प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नीट परीक्षा लागू करून सरकार कुठल्याही स्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही. २०१८ पासून नीट परीक्षा लागू करावी, अशी मागणी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात करणार आहे. यासाठी फेरविचार याचिका दाखल करण्यात येणार आहे.