परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर - प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2017 05:08 AM2017-02-28T05:08:19+5:302017-02-28T05:08:19+5:30
जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे.
मुंबई : जगभरात आर्थिक मंदीचे सावट असतानाही भारताबरोबरच महाराष्ट्रही परदेशी गुंतवणुकीत आघाडीवर आहे. देशात होणाऱ्या आर्थिक गुंतवणुकीच्या ५० टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात होत असल्याचे प्रतिपादन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केले.
‘लोकमत’ एक्सलन्स अॅवॉडर््स या दिमाखदार सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून प्रभू बोलत होते. उद्योग आणि राजकारण करताना ‘लोकमत’ची साथ लागतेच हे मनोमन पटल्याचे त्यांनी या वेळी आवर्जून नमूद केले. त्यामुळेच उद्योग, सेवा क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्यांना मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा टप्पा असून, त्याविषयी त्यांचे कौतुक असल्याचे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन वर्षांपेक्षा कमी काळात देशाचे उज्ज्वल चित्र जगभर निर्माण केले आहे. त्यामुळे देशात गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बदलत्या लोकमतामुळेही गुंतवणूक वाढली आहे. येत्या काळात आपली अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अग्रस्थानी असणार आहे. पुढच्या काळात जगातील प्रगत देशांसोबत महाराष्ट्राचीही तुलना केली जाईल, असा आशावादही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
प्रभू पुढे म्हणाले की, उद्योग-धंद्यांबरोबरच आता सेवाक्षेत्र विकसित होत आहे. गुंतवणुकीत या क्षेत्राचा वाटा ६० टक्के इतका आहे. भविष्यात हा वाटा आणखी वाढेल, अशी आशा आहे.
उत्पादकता नव्हेतर, सेवाक्षेत्रात गुंतवणूक वाढली पाहिजे. त्यामुळे आता शेतीबरोबरच शेतकऱ्यांचा विकास यावर मुख्यमंत्र्यांनी धोरण आखले आहे. गेल्या ५० वर्षांत शेती आणि शेतकऱ्यांचा विकास झालेला नाही, त्याकडे कायम दुर्लक्ष झाले आहे. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृतिशील धोरण राबवित आहेत.
आपल्याकडे उद्योजकतेला पूरक वातावरण असल्यामुळे भविष्यातही गुंतवणूक वाढेल. चीनमध्ये उद्योजकता वाढविण्यासाठी सरकार पायाभूत सुविधांकडे लक्ष पुरवित आहे. पण, मुळात उद्योजकता असण्याची गरज असते. आपल्याकडे उद्योजकता अधिक असल्यामुळे गुंतवणूक होते, असेही प्रभू शेवटी म्हणाले. (प्रतिनिधी)
>‘...नाहीतर जेवायला मिळणार नाही’
महाराष्ट्र, मुंबईबद्दल बोलत असताना गोव्याबद्दलही बोलले पाहिजे. माझी बायको गोव्याची आहे, नाहीतर घरी गेल्यावर जेवण मिळणार नाही, असे प्रभू म्हणताच हास्याची लकेर उमटली. गोवा, महाराष्ट्र ही भावंडे आहेत. राज्याला ७२० किमीची किनारपट्टी लाभलेली आहे. त्यामुळे गोव्यातील पर्यटनाप्रमाणेच महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
>‘देशांतर्गत पर्यटन वाढावे’
पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न होत आहेत,
मात्र आता देशांतर्गत पर्यटन वाढीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. देशांतर्गत पर्यटन वाढल्यावर जगाच्या कानाकोपऱ्यांतून पर्यटक आपल्याकडे आकर्षित होतील, अशी अपेक्षा प्रभू यांनी या वेळी व्यक्त केली.